नागपूर : एसटी महामंडळाला एसटी कष्टकरी जनसंघाने दिलेल्या काम बंद आंदोलनाचा सोमवारी फज्जा उडाला. तरीही सदावर्ते यांची प्रतिमा उजळवण्यासाठी मंत्री उदय सामंत यांनी शासन स्तरावर बैठक घेत सदावर्तेंची प्रतिमा उजळवण्याची सुपारी घेतली, असा आरोप महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.
एसटीमध्ये यापूर्वी साडे पाच महिने कर्मचाऱ्यांचा जो संप झाला, त्यातून कामगारांच्या हातात काहीही पडलेले नाही. त्या वेळी देण्यात आलेली वेतनवाढ ही चुकीची असून त्यात सेवा ज्येष्ठता पाळली गेली नाही. या शिवाय संप कालावधीतील साडे पाच महिन्यांचे वेतन देऊ, वेतन आयोग लागू करू, एसटीचे शासनात विलीनीकरण करू, महागाई भत्त्याचा फरक देऊ अशा अनेक घोषणा सदावर्ते दाम्पत्याकडून करण्यात आल्या व त्यातील काहीही कामगारांच्या पदरात पडले नाही. संप काळात विविध पदांच्या बढती खात्या अंतर्गत परीक्षा घेतल्या गेल्या त्या पासून अनेकांना वंचित राहावे लागले. सणा सुदीच्या काळात एसटी बँकेतील कर्जव्यवहार बंद आहेत त्या मुळे सदावर्ते यांच्या विरोधात एसटी कर्मचाऱ्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
हेही वाचा : गोंदिया : ‘त्याने’ घरकूलच काढले विकायला, शासनाचे अनुदान रखडल्याने संताप; देवरी नगरपंचायत पेचात
हेही वाचा : कापूस, तुरीच्या पिकांत गांजाचे आंतरपीक; राळेगाव तालुक्यात शेतकऱ्यावर पोलिसांची कारवाई
कामगारांत सदावर्तेंची नाराजी वाढतच आहे. सोबत मराठा आरक्षणाच्या विरोधात वारंवार टीका, विदर्भ , मराठवाडा महाराष्ट्रापासून वेगळा करण्याच्या वल्गना ते वारंवार करीत आहेत. त्यासाठी एसटी कामगारांचा वापर केला जात आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात कामगारांसोबत जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. ही नाराजी दूर व्हावी या उद्देशाने सरकारकडून वारंवार बैठका घेतल्या जात आहेत. त्यातून सदावर्ते यांची मलीन प्रतिमा उजळवण्याचा सरकारकडून प्रयत्न होत असल्याचेही बरगे यांनी प्रसिद्धीपत्रकातून सांगितले.