नागपूर : अनेक करोनाग्रस्तांनी भीतीपोटी स्टेराईड घेतल्याने त्याचे अनेक दुष्परिणाम बघायला मिळाले. आता घरोघरी चिकनगुनियाचे रुग्ण वाढल्याने कधी डॉक्टर तर कधी स्वत: रुग्णच स्टेराॅईड घेत आहेत, असे धक्कादायक निरीक्षण अस्थिरोग तज्ज्ञांकडून नोंदवण्यात आले. चिकनगुनियाच्या रुग्णांना सांधेदुखी, हात-पायात वेदना होतात. त्यामुळे डॉक्टरांकडून वेदना शमन औषधे दिली जातात. परंतु हे औषध खूप काळजीपूर्वक द्यावे लागतात. त्यातच चिकनगुनिया व डेंग्यू असे दोन्ही आजार असल्यास आणखी जास्त काळजी घ्यावी लागते. परंतु हल्ली अस्थिरोग तज्ज्ञांकडे येणाऱ्या रुग्णांच्या सांगण्यानुसार, त्यांनी स्वत: वा एखाद्या डॉक्टरांमार्फत स्टेराॅईडचे औषध घेतले आहे.
अकारण स्टेराॅईड घेणाऱ्या रुग्णांमध्ये गंभीर परिणामांचा धोका वाढला आहे. त्यातच नागपुरात सध्या चिकनगुनियाचे थैमान सुरू आहे. या रुग्णांत पूर्वीच्या तुलनेत सांधेदुखी व इतर त्रास दीर्घकाळ दिसतो. वेगवेगळी लक्षणेही विषाणूच्या जनुकीय बदलाचे संकेत देत आहेत, अशी माहिती उपराजधानीतील अस्थिरोग तज्ज्ञ व विदर्भ ऑर्थोपेडिक्स सोसायटीचे (व्हीओएस) अध्यक्ष डॉ. सत्यजित जगताप, सचिव डॉ. समीर द्विदमुठे, व्हाॅसकाॅन परिषदेचे सचिव डॉ. अलंकार रामटेके यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. एक ते दीड महिन्यानंतरही लक्षणे कमी होत नसलेल्या काही रुग्णांनाच स्टेराॅईड औषधांची गरज असते. तेही अत्यल्प प्रमाणात तज्ज्ञ डॉक्टरांमार्फतच घ्यायला हवी, असेही या डॉक्टरांनी सांगितले.
हेही वाचा : नागपूर: नियतीचा खेळ, अखेर प्र-कुलगुरूंना पद सोडण्याचे आदेश, शिक्षण मंचाला मोठा धक्का
नवीन लक्षणे कोणती?
चिकनगुनियाग्रस्तांमध्ये पूर्वी ताप, शरीरात दुखणे, हात-पायावर सूज अशी काही लक्षणे दिसत होती. उपचारानंतर एक आठवडा ते दीड महिन्यात ही लक्षणे जायची. यावेळी मात्र अनेक रुग्णांमध्ये दीड महिन्यानंतरही हातापायात वेदना, चेहरा व नाकाच्या त्वचेवर काळे डाग, अशी लक्षणे दिसत आहेत. वेदनाही दीड महिन्याहून जास्त काळ राहत असल्याचे डॉ. सत्यजित जगताप यांनी सांगितले.
व्हाॅसकाॅन परिषद ४ ऑक्टोबरपासून
विदर्भ ऑर्थोपेडिक्स सोसायटी (व्हीओएस)तर्फे व्हाॅसकाॅन परिषद नागपुरातील हाॅटेल सेंटर पाॅईंटमध्ये ४ ते ६ ऑक्टोबरला आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत विविध विषयांवर मंथन होणार आहे. याप्रसंगी डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. शेखर भोजराज, डॉ. अशोक जोहरी, डॉ. चंदनवाले, डॉ. सुधीर बाभूळकर, डॉ. एस. सुब्रमण्यम मार्गदर्शन करतील, अशी माहिती डॉ. समीर द्विदमुठे यांनी दिली.
मोडलेली हाडे तारांनी जोडण्याचे तंत्र
या राष्ट्रीय परिषदेला इटलीहून डॉ. मारिओ रंगारी येणार आहेत. ते मोडलेली हाडे तारेपासून जोडण्याचे नवीन तंत्र शिकवणार आहेत. या पद्धतीच्या तंत्रावर सविस्तर कार्यशाळेची ही पहिलीच वेळ आहे, अशी माहिती डॉ. अलंकार रामटेके यांनी दिली.