नागपूर : आईच्या शोधात वेणा नदीवर गेलेल्या चार वर्षीय मुलीवर गावातील १० ते १२ भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्या चिमुकलीचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी दोन वाजता हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गुमगावात घडली. हर्षिता रामसिंग चौधरी (रा. गुमगाव) असे मृत मुलीचे नाव आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली.
शेतमजूर असलेल्या रामसिंग चौधरी आणि पत्नी लक्ष्मी यांना पाच मुले आहेत. गेल्या सहा वर्षांपासून हे लक्ष्मी हिच्या आई रेखा रामटेके यांच्याकडे हिंगणाजवळील गुमगावात राहतात. लक्ष्मी आणि रेखा या दोघीही मायलेकी रोज गुमगाव ते डोंगरगाव रस्त्यावरील वेणा नदीवर कपडे धुण्यासाठी जात होत्या. त्यांच्यासोबत चार वर्षीय हर्षीता ही सुद्धा नदीवर आई व आजीसोबत जात होती. गुरुवारी दुपारी लक्ष्मी वेणा नदीवर कपडे धुवायला गेली होती. त्यामुळे काही वेळानंतर हर्षीतासुद्धा एकटीच नदीच्या दिशेने निघाली. काही वेळातच रस्त्यावरील भटक्या १० ते १२ कुत्र्यांनी मुलीवर हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्यांनी मुलीचे लचके तोडले. यात मुलीचा मृत्यू झाला. घटना उघडकीस येताच हिंगण्याचे ठाणेदार जीतेंद्र बोबडे यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी पंचनामा करुन आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
अशी आली घटना उघडकीस
बराच वेळ झाला तरी मुलगी हर्षीता घरी आली नाही. त्यामुळे तिच्या आईने शोधाशोध केली. काही वेळपर्यंत शोध घेतल्यानंतर ती वेणा नदीच्या दिशेने शोधण्यासाठी गेली. तर रस्त्यातच काही कुत्रे मुलीचे लचके तोडत असताना दिसले. तिने कुत्र्यांनी पळवले. गंभीर जखमी अवस्थेत मुलीला नागरिकांच्या मदतीने एम्स रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले.
आईने फोडला हंबरडा
मुलगी घरात दिसत नव्हती तसेच तिचा शोधाशोध केल्यानंतर ती परिसरातही दिसत नव्हती. त्यामुळे लक्ष्मीने मुलीच्या शोधासाठी नदीच्या दिशेने धाव घेतली नदीच्या काठावर कुत्र्याचा झुंड तिचे लचके तोडत असताना दिसतात आईने मोठ्याने हंबरडा फोडला. मदतीसाठी आरडा ओरड केली मात्र तोपर्यंत कुत्र्यांनी हर्षिताच्या शरीराचे लचके तोडले होते.