नागपूर : राज्य पोलीस दलात गेल्या वर्षभरापासून पोलीस उपनिरीक्षक आणि सहायक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया रखडली होती. मात्र, पोलीस दलातील अधिकाऱ्यांची वाणवा बघता पोलीस महासंचालक कार्यालयातून पदोन्नतीची प्रक्रिया सुरु केली आहे. येत्या दिवाळीत पोलीस अधिकाऱ्यांनी पदोन्नतीचे ‘गिफ्ट’ मिळणार आहे. राज्य पोलीस दलातील उपनिरीक्षकांची १११ तुकडी आणि सहायक पोलीस निरीक्षकांची १०२ आणि १०३ तुकडी पदोन्नतीच्या कक्षेत आहे. मात्र, काही पोलीस अधिकारी मॅट आणि उच्च न्यायालयात गेल्यामुळे गेल्या वर्षभरापासून पदोन्नती प्रक्रिया रखडली होती.
गृहमंत्रालय आणि पोलीस महासंचालक कार्यालयात योग्य ताळमेळ नसल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांची पदोन्नतीवर विचार झाला नव्हता. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. पदोन्नती मिळण्यास उशिर होत असल्यामुळे अनेक पोलीस अधिकारी खासगीत आपली खदखद व्यक्त करीत होते. अखेर पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यातील ११७ पोलीस उपनिरीक्षकांना पदोन्नतीसाठी संवर्ग मागविण्यात आले आहेत. गेल्या वर्षभरानंतर संवर्ग मागविण्यात आल्यामुळे पोलीस अधिकारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या पोलीस उपनिरीक्षकांना संवर्ग भरून द्यावे लागणार असून येत्या दिवाळीत पदोन्नतीचे गिफ्ट मिळणार असून अधिकाऱ्यांच्या खांद्यावर ‘तिसरा स्टार’ लागणार आहे.
हेही वाचा : उपनिबंधक वैशाली मिटकरी यांना दहा हजारांची लाच स्वीकारताना अटक
सहायक निरीक्षकांची पदोन्नती अधांतरी
गृहमंत्रालय आणि पोलीस महासंचालक कार्यालयाकडून सहायक पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीसंदर्भात गांभीर्य दाखविल्या जात नाही. वारंवार १०५ तुकडीचे अधिकारी न्यायालयात गेल्याचे कारण समोर करून पदोन्नतीवर विचार केल्या जात नाही. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून हक्काच्या पदोन्नतीपासून वंचित असलेल्या सहायक निरीक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
हेही वाचा : धक्कादायक! बांधकाम मजुराच्या डोक्यातून लोखंडी सळई आरपार…
कोकण-नागपुरात सर्वाधिक रिक्त जागा
उपनिरीक्षकांच्या पदोन्नतीसाठी सहायक पोलीस निरीक्षक पदाची गोळाबेरीज करण्यात आली असून कोकण-२ आणि नागपूर विभागात सर्वाधिक रिक्त जागा दर्शविण्यात आल्या आहेत. कोकणमध्ये ८७ तर नागपूर विभागात २३ जागा रिक्त आहेत. नाशिक-अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये केवळ दोन जागा रिक्त असल्याचे दर्शविण्यात आले आहे. जर सहायक निरीक्षकांना वेळेवर पदोन्नती मिळाली तर उपनिरीक्षकांच्या पदोन्नतीचा आकडा आणखी वाढू शकतो.