नागपूर : मेडिकलमध्ये कमी वजनाच्या जन्मलेल्या बाळाच्या मेंदूत संक्रमण निघाले. सेप्टिक शॉकमुळे त्याची प्रकृती खालावली. डॉक्टरांनी जीवनरक्षण प्रणालीवर ठेवले. बालरोग विभागातील डॉक्टरांनी परिश्रम घेतल्याने तो बरा झाला. त्याला बुधवारी सुट्टी झाल्यावर आई- वडिलांनी हात जोडून डॉक्टरांचे आभार मानले. राणी अतुल गवई असे बाळाच्या आईचे नाव आहे. रुग्णावर मध्य नागपुरातील डागा शासकीय सृती स्त्री रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, गंभीर परिस्थितीमुळे नातेवाईकांनी रुग्णाचा उपचार मेडिकलमध्ये हलवला.
हेही वाचा : तलाठी भरतीतील ओबीसींची पदे घटली; परीक्षा झाल्यानंतर बिंदूनामावलीत बदल
विविध तपासणीत आई व बाळाची गुंतागुंत बघता लवकर प्रसूतीचा निर्णय झाला. बाळ कमी वजनाचे जन्मले. त्यानंतर तिसऱ्या दिवशीच बाळाला अपस्मारचे झटके आले. तातडीने मुलाला बालरोग विभागात हलवले गेले. विविध तपासणीत मुलाच्या मेंदूत संक्रमण आणि सेप्टिक शाॅक आल्याचे निदान झाले. या सगळ्या उपचारासाठी बालरोग विभागातील सगळ्याच डॉक्टरांसोबतच मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, स्त्रीरोग व प्रसूतीरोग विभागाचे डॉ. आशीष झरारिया हेही बाळासह तिच्या आईच्याही प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. शेवटी सगळ्यांच्या उपचाराला यश आले. बुधवारी बाळाला घेऊन आई-वडील घरी परतले.