नागपूर : अंमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि सीमाशुल्क मंत्री शंभुराजे देसाई यांची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी येथे केला. तसेच पाटील याला दीड वर्ष कोणाचा आशीर्वाद होता याचे उत्तर उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे, असेही त्या म्हणाल्या.
अंधारे नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलत होत्या.त्या म्हणाल्या, शिवसेना (ठाकरे गट) सातत्याने ललित पाटील कसा पळाला, अशी विचारणा करूनही त्यास रुग्णालय प्रशासन आणि पोलीस उत्तर देत नाही. त्याचे उत्तर दस्तुरखुद्द पाटील यांनी दिले. तसेच ‘मी पळालो नाही, मला पळवले गेले’ असा धक्कादायक खुलासाही त्याने केला. आता त्याला कोण पळवू शकतो? एकटे ससून रुग्णालय याला जबाबदार असेल, असे वाटत नाही. त्याला बाहेर गाड्या कोणी पुरवल्या. तो पुण्यातून गुजरात, नाशिकडे जातो. तेथे राहतो. पैशाची जमवाजमव करतो. पुन्हा मुंबईकडे परत जातो, हा प्रवास सहज शक्य नाही. नाशिकमध्ये दोनशे-तीनशे कोटींचा कारखाना उभाच कसा राहतो, असा सवाल अंधारे यांनी केला.
हेही वाचा : ‘समृद्धी’वर व्हिडिओ पाहत ट्रॅव्हल्स चालविली! बहाद्दर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
नाशिकचे पालकमंत्री म्हणून दादा भुसे यांची जबाबदारी फार मोठी आहे. या गोष्टी माहितीच नाही, असे भुसे म्हणत असतील तर ते सपशेल अपयशी आहेत आणि माहिती असेल तर त्यांनी या गोष्टी चालू कशा दिल्या, असा प्रश्न उपस्थित होतो याकडे त्यांनी लक्ष वेधले. या प्रकरणात शंभूराजे देसाई यांचीही चौकशी झाली पाहिजे. कारण संपूर्ण राज्यात ‘एमडी’ पुरवठा नाशिकमधून झाला. त्याचवेळेला सोलापूरला कारखाना सापडला. येरवडा न्यायालय परिसरात शुभम पास्ते नावाच्या व्यक्तीजवळ चरस सापडले.
हेही वाचा : ‘त्या’ भाजप पदाधिकाऱ्यावर कारवाई करा, राष्ट्रवादीचे आयुक्तांना निवेदन
हे ठाईठाई चरस आणि अंमली पदार्थ इतक्या सहज उपलब्ध कसे होते? शंभुराजे देसाई यांची सीमाशुल्क मंत्री म्हणून पकड सैल होते आहे काय, मुख्यमंत्र्याच्या आजूबाजूला फिरताना आपल्या प्रशासकीय कामाचा त्यांना विसर पडतो आहे काय, अशी प्रश्नांची सरबत्ती अंधारे यांनी केली. ससून रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक १६ मध्ये आरोपी सरकारचा जावई बनून दीड वर्ष पंचतारांकित सेवांचा लाभ कोणाच्या आशीर्वादाने घेत होता, याचे उत्तर गृहमंत्री फडणवीस यांनी दिले पाहिजे, असेही अंधारे म्हणाल्या.