नागपूर : शहरात गुन्हेगार पिस्तूलाचा बिनधास्त वापर करीत असून तहसील पोलिसांनी शुक्रवारी पप्पू ऊर्फ परवेज पटेल याच्या घरावर छापा घालून ९ पिस्तूल आणि ५२ काडतूस जप्त केले आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी मोमीनपुऱ्यात छापा घालून ९ पिस्तूल आणि ८४ काडतूस जप्त करण्यात आली होती.
तहसील हद्दीतील काही गुन्हेगारांकडे पिस्तूल असल्याची माहिती ठाणेदार विनोद पाटील, निरीक्षक संदीप बुवा यांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी काही गुन्हेगारांवर नजर ठेवली होती. गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. पप्पू पटेल हा वादग्रस्त व्यापारी असून त्याच्याकडे दोन पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
हेही वाचा : ‘एनआरएचएम’ कर्मचाऱ्यांचे पीपीई किट घालून आंदोलन; पालकमंत्र्याच्या घरासमोर साजरी केली काळी दिवाळी
त्यांनी शुक्रवारी रात्री पप्पूच्या दुसऱ्या पत्नीच्या घरावर छापा घातला आणि ९ पिस्तूल आणि ५२ काडतूस जप्त केले. हे पिस्तूल तौहीर ऊर्फ बबलू अहमद (रायपूर) याने पुरवले होते. त्यालाही अटक करण्यात आली. यापूर्वी, तहसील पोलिसांनी इम्रान आलम (४३) रा. परासीया (मध्यप्रदेश) याला अटक करून ९ पिस्तूल जप्त केले होते.