नागपूर : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मुख्य सुरक्षा अधिकारी असल्याची बतावणी करून एका युवकाने शहरातील जवळपास १० सराफा व्यावसायिकांची लाखोंनी फसवणूक केली. त्या ठगबाज युवकाविरुद्ध सीताबर्डी, अंबाझरी आणि बजाजनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रोकडे ज्वेलर्समध्ये गडकरी यांच्या नावाचा वापर करुन फसवणूक करण्याचा प्रयत्न करताना या युवकाचे बींग फुटले.

बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोकडे ज्वेलर्समध्ये एक युवक दागिने खरेदी करण्यासाठी आला. त्यांनी स्वतःचे नाव राजवीर ऊर्फ पंकज चावला असे सांगितले. “मी गडकरी साहेबांचा मुख्य सुरक्षा अधिकारी आहे. मला गडकरी साहेबांनी पाठवले आहे. गडकरी यांनी रोकडे ज्वेलर्समध्ये दागिने खरेदी करण्याचा सल्ला दिला.’ अशी बतावणी त्याने केली. व्यवस्थापकाने त्याची ओळख संचालक राजेश रोकडे यांच्याशी करुन दिली. त्यानंतर त्याला दागिने खरेदी करण्यासाठी दुकानात नेले. त्या युवकाने पाच लाखांचे दागिने खरेदी केले आणि दागिन्याचे बिल धनादेशाने देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे राजेश रोकडे यांना संशय आला. त्यांनी गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून राजवीर चावला या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्याबाबत माहिती घेतली. राजवीर चावला नावाचा कोणताही सुरक्षा अधिकारी नसल्याचे कार्यालयातून कळविण्यात आले. यादरम्यान तो युवक पळून गेला. रोकडे यांनी लगेच सीसीटीव्ही फुटेजमधून त्या ठकबाज युवकाचा फोटो घेऊन बजाजनगर पोलीस स्टेशन गाठले. लेखी तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला, अशी माहिती अंबाझरीचे ठाणेदार विनायक गोल्हे यांनी दिली.

हेही वाचा : धोतर वस्त्र प्रसार अभियान; धोतर घाला, संस्कृती पाळा

व्हॉट्सअॅप ग्रूपवर टाकले ठकबाजाचे फोटो

राजेश रोकडे यांनी फसवणुकीचा प्रयत्न हाणून पाडल्यानंतर त्या तोतया सुरक्षा अधिकाऱ्याचे फोटो सराफा संघटनेच्या व्हॉट्सअॅप ग्रूपवर टाकले. त्यानंतर लगेच कोठारी ज्वेलर्स आणि बटुकभाई ज्वेलर्सच्या संचालकांनी राजवीर चावला ओळखले आणि फसवणूक झाल्याची कबुली दिली. त्यामुळे लगेच पोलीस ठाण्यात तक्रारी करण्यात आल्या.

हेही वाचा : “मृद व जलसंधारण विभागात तीन हजार पदे भरणार”, मंत्री संजय राठोड यांची घोषणा; पालकमंत्रिपदाबाबत म्हणाले…

बटुकभाई आणि कोठारी ज्वेलर्सची फसवणूक

सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बटुकभाई ज्वेलर्समध्ये दोन दिवसांपूर्वीच हा राजवीर चावला गेला होता. त्याने भाजप नेते गडकरी यांचा मुख्य सुरक्षा अधिकारी असल्याचे सांगून तब्बल ५ लाख रुपये किंमतीचे दागिने खरेदी केले. त्यांना बनावट धनादेश देऊन बील दिले. त्यानंतर तो अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोठारी ज्वेलर्समध्ये गेले. तेथेही त्याने गडकरी यांच्या नावाचा वापर करुन २.५७ लाख रुपये किंमतीचे दागिने विकत घेतले. तेथेही त्याने धनादेशाने बील दिले. दोन्ही सराफा व्यवसायिकांनी गडकरी यांचे नाव सांगितल्यामुळे विश्वास ठेवला. मात्र, त्या युवकाने त्यांची फसवणूक केली.

Story img Loader