नागपूर: घराजवळ खेळताना एका दहा वर्षीय मुलीचे केस जनरेटरमध्ये अडकून त्वचा सोलून निघाली. अत्यवस्थ अवस्थेत तिला मेडिकलमधील ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल केले गेले. येथे वेगवेगळ्या किचकट शस्त्रक्रियेनंतर अखेर तिला जीवदान मिळाले. तब्बल दोन महिन्यानंतर तिला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मुलगी घराजवळ खेळत असताना तिच्या बाजूलाच एक जनरेटर सुरू होते. ती अचानक जनरेटरच्या बाजूला पडली. जनरेटरच्या पट्ट्यामध्ये केस अडकल्यामुळे ती जनरेटरमध्ये ओढली गेली. केसांसह त्वचाही सोलली. तिचे कानही बाहेर आले होते. तर त्वचा सोलल्याने कवटी दिसत होती.
अवस्थेत अत्यवस्थ मुलीला मेडिकलमध्ये हलवले. येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये तज्ज्ञांच्या देखरेखीत उपचार सुरू झाले. मुलीच्या उपचारादरम्यान ती अत्यवस्थ होती. तिला बऱ्याच संक्रमणाचा धोका होता. प्लास्टिक सर्जरी विभागाने शस्त्रक्रिया केली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे विशेष लक्ष ठेऊन होते. अखेर डॉक्टरांनी अतिशय कुशलतेने दोन टप्प्यांमध्ये ‘स्कीन ग्राफ्टिंग’ शस्त्रक्रिया केली. दोन महिन्यानंतर मुलीला सुट्टी झाली. अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी डॉक्टरांचे कौतुक केले. डॉ. अब्दुल कुरेशी, डॉ. श्रीकांत पेरका आणि त्यांच्या सहायक पथकामुळे मुलीचे प्राण वाचले.