लोकसत्ता टीम
नागपूर: मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानातील चित्त्यांना त्यांची सीमा माहिती नाही, त्यामुळे आता एक-एक करुन चित्ते उद्यानाची सीमा पार करुन बाहेर पडत आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी चित्ता गस्ती पथकही बाहेर पडले, पण गावात चोर शिरल्याचे समजून गावकऱ्यांनी या गस्तीपथकावर हल्ला केला आणि हवेत गोळीबार करत बेदम मारहाण केली. यात मध्यप्रदेश वनखात्याचे चार कर्मचारी जखमी झाले.
कुनो राष्ट्रीय उद्यानातून चित्ते वारंवार बाहेर पडत आहेत. त्यामुळे त्यांना शोधण्यासाठी चित्त्याच्या गस्ती पथकालाही बाहेर जावे लागत आहे. नर चित्ता दोनदा या उद्यानातून बाहेर पडल्यानंतर आता मादी चित्ता देखील बाहेर पडली. तिच्या गळ्यातील जीपीएसच्या आधारे शोध घेत हे पथक बाहेर पडले. रात्रीच्या सुमारास ही चमू शिवपूरीच्या बुरखेडा गावाजवळून गेली.
हेही वाचा… गोंदिया: राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार पुत्राच्या नेतृत्वात २ नगराध्यक्षांसह १५ नगरसेवक शिंदे गटात
रात्रीच्या सुमारास वाहनाने इतके सारे जण एकत्र पाहून गावकऱ्यांना ते गुरे चोर वाटले आणि त्यांनी गोळीबार केला. या पथकातील कर्मचाऱ्यांना त्यांनी मारहाण केली. या दगडफेकीत वाहनांचे नुकसान तर झालेच, पण पथकातील चार कर्मचारीदेखील जखमी झाले. बुरखेडा गावात या पूर्वीदेखील चोरीच्या दोन-तीन घटना घडल्या. तसेच या गावात दरोडेखोरांच्या हालचाली देखील आहे. चित्ता पथक गावातून तीन-चार वेळा गेल्यामुळे गावकऱ्यांना ते दरोडेखोर असल्याचा संशय आला आणि त्यांनी मारहाण केली.