नागपूर : यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे दरवर्षी दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार या वर्षी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना जाहीर झाला आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनी २५ नोव्हेंबर २०२३ ला सायं. ५ वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित समारंभात सेंटरचे अध्यक्ष व राज्यातील ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते डॉ. यशवंत मनोहर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दोन लाख रुपये रोख व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यशवंतराव चव्हाण सेंटरच्यावतीने दरवर्षी कृषी, औद्योगिक, सामाजिक, व्यवस्थापन, प्रशासन, विज्ञान, तंत्रज्ञान, ग्रामीण, आर्थिक विकास, मराठी साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना किंवा संस्थेला ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार’ दिला जातो. यंदा हा मान डॉ. यशवंत मनोहर यांना मिळाला.

हेही वाचा : मराठा आरक्षण : न्यायमूर्ती संदीप शिंदे विदर्भात येणार, असा आहे कार्यक्रम

डॉ. यशवंत मनोहर यांनी सातत्याने कसदार लेखन करून मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. समाजातील नाकारलेल्या माणसाच्या जगण्यातला उद्वेग, आशय-अभिव्यक्ती बनविणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून मनोहरांकडे पाहिले जाते. त्यांच्या ‘उत्थानगुंफा’ या पहिल्याच कवितासंग्रहाने वाङ्मयजगतामध्ये त्यांची कवी म्हणून ओळख निर्माण झाली. त्यांच्या साहित्यातून मानवतावादी दृष्टीकोन आणि संविधानातील मूल्यजागर अगदी स्पष्टपणे व्यक्त होतो.

हेही वाचा : VIDEO : “राज्यातील समाज एकमेकांसमोर उभे राहतात, ही परिस्थिती…”, मराठा अन् ओबीसी आरक्षणावर फडणवीसांची प्रतिक्रिया

पुरस्काराची सुरुवात १९९० पासून झाली. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ बाबा आढाव, ज्येष्ठ कवयित्री स्व. शांता शेळके, ज्येष्ठ पत्रकार गोविंदराव तळवलकर, प्रा. एन.डी. पाटील, सिरम इन्स्टिटयुट ऑफ इंडिया असे अनेक मान्यवर या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur the yashwantrao chavan state level award is declared to dr yashwant manohar cwb 76 css