नागपूर : वस्तू चोरी जाणे आणि त्यांची पोलिसात तक्रार करणे हे काही नवीन नाही. परंतु मलवाहिनीवरील झाकण चोरीला गेल्यानंतर पोलिसात तक्रार होण्याची कदाचित ही पहिलीच घटना असावी.
नागपूर महापालिकेच्या मंगळवारी झोनमधील प्रभाग क्रमांक १ अंतर्गत विविध भागांमधील सिवर लाईन चेंबरवरील लोखंडी झाकण चोरी झाल्याप्रकरणी महापालिकेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार मंगळवारी झोनच्या कनिष्ठ अभियंत्यांद्वारे जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
हेही वाचा – भंडारा : आपत्तीजनक फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार
प्रभाग क्र. १ अतंर्गत युनियन बँक, जरीपटका, चौधरी चौक, डब्ल्यू.सी.एल. रोड, सी.एम.पी.डी.आय.रोड, डी.एम. हॉस्पीटल, बजाज कॉलेज या परीसरातील सिवर लाईन चेंबरवरील लोखंडी झाकण २८ एप्रिल २०२३ ते ३ मे २०२३ रात्रीच्या वेळेला अज्ञात व्यक्तीकडून चोरीला नेण्यात आले. एकूण ८ सिवर चेंबरवरील लोखंडी झाकण प्रती नग ८००० रुपये याप्रमाणे एकूण ६४००० रुपये किंमतीचे झाकण चोरीला गेलेले आहेत.