नागपूर : शहरात वेगवेगळ्या तीन ठिकाणी झालेल्या अपघातात एका महिलेसह तीन जण ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले. हे अपघात कळमना,पारडी आणि जरीपटका परिसरात झाले. मंगला महिपत उमाटे (५१, रा.बिडगाव चौक, वाठोडा), विकास चंद्रशेखर बोरकर (३२, समतानगर, जरीपटका) आणि आयूष प्रितम अवचट (१७, रा. सुभाष मैदान, पारडी) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत, मोटारसायकलने जात असलेल्या दोन तरुणांना भरधाव टिप्परच्या चालकाने जबर धडक दिली आणि पळून गेला. या अपघातात एका तरुणाचा उपचार मिळण्यापूर्वीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी आहे. आयूष अवचट (१७) हा ठार झाला तर जखमी अमन जगदीश मानकर (२१) रा. पारडी याच्यावर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सोमवारी रात्री एक वाजता आयूष आणि अमन मोटारसायकलने जात होते. भरतनगर रोडने कळमना मार्केटकडे जात असताना गोकुळ डेअरीजवळ मागून आलेल्या ट्रकने मोटारसायकलला जबर धडक दिली आणि पळून गेला. ही धडक इतकी जोरदार होती की दोघेही दुचाकीवरून उसळत रस्त्यावर पडले. दोघांनाही गंभीर मार लागला. आसपासचे नागरिक मदतीसाठी धावले. दोन्ही जखमींना रुग्णालयात रवाना करण्यात आले. मात्र आयूषचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर अमनवर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी आयूषचे काका प्रशांत यांच्या तक्रारीवरून आरोपी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे.
दुसऱ्या घटनेत, महिपत उमाटे हे पत्नी मंगला यांच्यासह सोमवारी दुपारी बारा वाजता दुचाकीने जात होते. नागेश्वरनगरातून जात असताना त्यांना स्कूल बसने धडक दिली. या धडकेत दोघेही पती-पत्नी गंभीर जखमी झाले. मंगला यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मंगला यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी स्कूलबसच्या चालकाविरुद्ध पारडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
तिसऱ्या घटनेत, विकास चंद्रशेखर बोरकर हा रविवारी अकरा वाजता पायी घराकडे जात होता. मार्टीननगरातून जात असताना एका भरधाव ट्रकने विकासला धडक दिली. या धडकेत विकास गंभीर जखमी झाला. त्यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादम्यान विकासचा मृत्यू झाला.
कार चालकाने घातला हैदोस, ३ वाहनांना दिली धडक, महिला जखमी
नागपूर : अजनीच्या काशीनगर परिसरात एका कारच्या चालकाने हैदोस घालत एका महिलेला धडक देऊन गंभीर जखमी केले. त्यानंतर त्याने परिसरातील तीन वाहनांना धडक देऊन नुकसान केले. या घटनेमुळे काही वेळासाठी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी आरोपी कार चालक आदर्श मिश्रा (३३) रा. काशीनगरविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. जखमी महिला माला गोवर्धन पोटपोसे (६५) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री माला यांच्या घरी पाहुणे आले होते. त्यांच्यासाठी मालाने गेट उघडले. त्याच वेळी आरोपी आदर्श कारने भरधाव घरी जात होता. या दरम्यान त्याचे वाहनावरून नियंत्रण सुटले आणि त्याने गेट बंद करीत असलेल्या माला यांना जबर धडक दिली. त्यानंतर घराजवळच उभ्या तन्मय पांडव यांची मोटारसायकल, मालाचे जावई शैलेष मेंढे यांची कार आणि राज कांबळे यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात तिन्ही वाहनांचे नुकसान झाले. मोठा आवाज आसपासचे नागरिक घरातून बाहेर आले. आदर्श घटनास्थळावरून पळण्याच्या तयारीत असतानाच लोकांनी त्याला पकडले. काही लोकांनी त्याला मारहाणही केली. घटनेची माहिती मिळताच अजनी पोलिस घटनास्थळी पोहोचले. आदर्शविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला ताब्यात घेतले.