नागपूर : ४३ वर्ष जुने प्रकरण बंद करण्याच्या नादात पोलिस विभागाने चक्क न्यायालयासमोर आरोपीशी नावसाधर्म्य असलेल्या भलत्याच व्यक्तीला उभे केले. इतकेच काय तर न्यायालयाने संबंधित व्यक्तीला १९ दिवस कारागृहात पाठविले. मात्र वास्तव समोर आल्यावर त्याची निर्दोष मुक्तता केली. पोलिसांच्या हलगर्जीमुळे निर्दोष व्यक्तीचे आयुष्यावर डाग लागला. पोलिसांच्या एका चुकीमुळे गेलेली प्रतिष्ठा परत मिळविण्यासाठी तो व्यक्ती वणवण फिरत आहे.
नेमके प्रकरण काय?
मणीराम कारू ठाकरे (६२, तोतलाडोह, देवलापार) या व्यक्तीसोबत हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. १४ ऑक्टोबर १९८१ रोजी मणीराम काशीराम ठाकरे याच्याविरोधात महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. त्याला काही दिवसांनी जामीन मिळाला होता व त्यानंतर आरोपी फरार झाला. तो न्यायालयासमोर कधीच उभा झाला नाही. २०१० साली जेएमएफसी रामटेकने प्रकरणाला बंद करण्याचा आदेश दिला होता. मात्र काही कालावधीने प्रकरण परत सुरू झाले. जेएमएफसी रामटेककडून प्रोक्लेमेशन नोटीस जारी करण्यात आली. देवलापार पोलिस ठाण्यातील पथकाने ६ सप्टेंबर २०२४ रोजी मणीराम काशीराम ठाकरे ऐवजी मणीराम करुलाल ठाकरे याला ताब्यात घेतले. त्याने आधार कार्ड व इतर दस्तावेज दाखवून तो मी नव्हेच असा दावा केला. मात्र पोलिसांनी कुठलीही पडताळणी न करता त्याला न्यायालयासमोर सादर केले. न्यायालयाने त्याला कारागृहात पाठविले. त्याचे वकील अॅड. प्रीतम खंडाते व अॅड. संतोष चव्हाण यांनी जामिनासाठी अर्ज केला.
न्यायालयात वास्तव आले पुढे
जमीन अर्जावर सुनावणी दरम्यान त्याने न्यायालयासमोर वास्तव मांडले. त्याची कथा ऐकून न्यायालय देखील आश्चर्यचकित झाले आणि न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली. मात्र तोपर्यंत गावात ही बातमी पसरली होती. गावकऱ्यांनी त्याला वाळीत टाकले.
हे ही वाचा…नागपूरचे फुटपाथ मोकळे का नाही? उच्च न्यायालयाची महापालिका, पोलिसांना विचारणा…
पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
देवलापार पोलिस ठाण्याच्या कार्यप्रणालीवरच या प्रकरणामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. १९८१ साली निर्दोष मणीरामचे वय १९ वर्षे होते तर आरोपी मणीराम ४५ वर्षांचा होता. प्रकरण लवकरात लवकर बंद करण्याच्या नादात व्यक्तीच्या आयुष्याशी खेळ खेळला. १९८१ साली निर्दोष मणीराम बालाघाटमध्ये राहत होते. मात्र पोलिसांनी ते तपासण्याचीदेखील तसदी घेतली नाही. फाईल बंद करण्याच्या नादात पोलिसांनी एका निर्दोष व्यक्तीला आरोपी केल्याचा आरोप वकिलांनी केला आहे