नागपूर : शहरातील कायदा व सुव्यवस्थेसह वाहतूक व्यवस्थेचेही तीन-तेरा वाजले आहेत. शहरात वाहतूक नियम मोडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या तीन महिन्यांत वाहतूक पोलिसांनी ४ लाख ५२ हजार वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यामध्ये सर्वाधिक ३ लाख २१ हजार हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीचालकांचा समावेश आहे.
राज्यभरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये नागपूर अव्वल स्थानावर आहे. शहरात वाहतूक पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन होत नाही. तसेत शहरातील बरेच वाहतूक सिग्नल बंदावस्थेत आहेत. त्यामुळे अनेक वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई होत नाही. याच कारणामुळे वाहनचालकांची हिम्मत वाढून सर्रास वाहतूक नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे.
गेल्या वर्षातील तीन महिन्यांची तुलना करता यावर्षी १ लाख ७८ हजार चालान कारवाई जास्त करण्यात आली आहे. गेल्या वर्षी २ लाख ७४ हजार दंडात्मक चालान कारवाई करण्यात आली तर यावर्षी २०२५ मध्ये जानेवारी ते मार्च यादरम्यान ४ लाख ५२ हजार ५२१ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक कारवाई वाहतूक सिग्नलचे उल्लंघन करणे, परवाना नसताना वाहन चालविणे, हेल्मेट न वापरणे, रस्त्यावर “पार्किंग’ करणे, ‘ट्रीपलसीट’ वाहन चालविणे आणि फँन्सी नम्बर प्लेटचा वापर करणे या कारवाईचा समावेश आहे.
सर्वाधिक कारवाई हेल्मेट न घालणाऱ्यांवर करण्यात आली. तब्बल ३ लाख २१ हजार दुचाकीचालकांवर हेल्मेट न घातमुळे दंड वसूल करण्यात आला. वैध परवाना नसतानाही वाहन चालविणाऱ्या २४ हजार १४६ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून ९७५६ दुचाकीचालकांवर ‘ट्रिपलसीट’ वाहन चालविल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली. रस्त्यावर पार्किंग करणाऱ्या२३ हजार ५२६ वाहनचालकांवर कारवाई करीत दंड वसूल करण्यात आला.
नियम मोडण्यात तरुणी-महिला आघाडीवर
शहरात वाहतुकीचे नियम मोडण्यात पुरुषांप्रमाणे महिलासुद्धा आघाडीवर आहेत. अनेक चौकात लाल दिवा सुरु असताना तरुणी-महिला बिनधास्तपणे सिग्नल तोडून सुसाट गाड्या पळवतात. पुरुषांसह अशा महिला वाहनचालकांवर सीसीटीव्ही फुटेजमधून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.
दीड हजारांवर सीसीटीव्ही नादुरुस्त
स्मार्ट सीटी प्रकल्पाअंतर्गत शहरात जवळपास ३६०० वर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यापैकी दीड हजारांवर सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. तर महापालिकेने ११०० कॅमेरे नादुरुस्त असल्याचा दावा केला आहे. सीसीटीव्ही बंद असल्यामुळे वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्ही फुटेजवरुन कारवाई करणे अडचणीचे ठरत आहे.
वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तसेच विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
माधुरी बाविस्कर (सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा.)