नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कारकीर्दीवर आधारीत ‘गडकरी’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर १६ ऑक्टोबरला (सोमवारी) प्रदर्शित केला जाणार आहे. वसंतराव देशपांडे सभागृहात सायंकाळी ७ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार दत्ता मेघे आणि क्रिक्रेटर उमेश यादव उपस्थित राहणार आहेत. या चित्रपटात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भूमिका नागपूरकर असलेल्या राहुल चोपडा यांनी तर ऐश्वर्या डोरले यांनी कांचन गडकरी यांची भूमिका साकारली आहे. शिवाय गडकरींच्या मित्राची आणि कुटुंबातील सदस्यांची भूमिकाही नागपुरातील कलावंतानीच साकारली आहे.
हेही वाचा : मानवी तस्करी, गुलामगिरीविरोधात यवतमाळात ‘वॉक फॅार फ्रिडम’
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आजवरच्या कारकिर्दीवर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट २७ ऑक्टोबरपासून सर्व चित्रपटगृहांत प्रदर्शित होत असताना या चित्रपटाचा प्रिमियर शो सोमवारी होणार आहे. या चित्रपटाचे ८० टक्के चित्रीकरण नागपुरात करण्यात आले आहे. या चित्रपटात गडकरी यांच्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनातील काही प्रसंग, त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता युवा मोर्चामध्ये त्यांनी केलेली कामे. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या मित्र मंडळींचा त्यांना लाभलेला सहवास आणि त्यानंतर राजकीय क्षेत्रात सुरू झालेला विविध टप्प्यांवरचा प्रवास या चित्रपटात दाखविण्यात आला आहे. अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे अक्षय अनंत देशमुख निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे.