नागपूर : केंद्र सरकारच्या हिट ॲन्ड रन कायद्याच्या विरोधात ट्रक चालकांनी पुकारलेल्या संपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आता ट्रान्सपोर्ट मालक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना या प्रकरणात मध्यस्थीसाठी साकडे घालणार आहेत.
केंद्र सरकार लेखी हमी देत नसल्याने आंदोलक संपावर अडून आहेत. नागपूर जिल्ह्यातील निम्याहून जास्त चालक संपावर असले तरी काही प्रमाणात माल वाहतूक सुरू असल्याने पुरवठ्यावर जास्त परिणाम झाला नाही. परंतु आंदोलनाची तीव्रता वाढल्यास जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढण्याचा धोका आहे. ट्रान्सपोर्ट मालकांकडून वारंवार आवाहन केल्यावरही चालक सेवेवर येत नसल्याने घेतलेल्या कर्जाचे हप्ते व इतर खर्च काढायचा कुठून ही चिंता मालकांना लागली आहे. त्यामुळे आता ट्रान्सपोर्ट मालक गडकरी आणि भागवत यांची भेट घेत त्यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती करणार आहेत. “ केंद्र सरकारच्या लेखी आश्वासनाशिवाय चालक सेवेवर यायला तयार नाहीत. त्यामुळे लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेऊन मध्यस्थी करण्याची विनंती करणार आहोत.” असे नागपूर ट्रकर्स युनिटी संघटनेचे अध्यक्ष कुक्कु मारवाह यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : संमेलनाला दोन कोटी, तरी पैशांसाठी पदर! शासकीय निधी अद्याप महामंडळाच्याच ताब्यात
वाद काय ?
हिट अँड रन प्रकरणात संसदेत कायदा मंजूर झालाय. त्यात बेजबाबदारपणामुळे मृत्यू झाल्यास विशेष प्रावधान करण्यात आलय. कायद्यातील बदलानुसार, ड्रायव्हरने वेगात आणि बेजबाबदारपणे गाडी चालवण्यामुळे मृत्यू झाल्यास तो पोलीस आणि मॅजिस्ट्रेटला माहिती दिल्याशिवाय पळून गेल्यास १० वर्ष तुरुंगवास आणि ७ लाख रुपयापर्यंत दंड लागू शकतो. हा कायदा दुचाकीपासून कार, ट्रक, टँकर सर्व प्रकारच्या वाहनचालकांना लागू होतो. या दंड आणि शिक्षेची तरतूद वाढवल्याने ट्रक चालक संतापले आहे.