नागपूर : ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या युवकाने प्रेयसीच्या १२ वर्षीय मुलीचे ट्रक चालकाने अपहरण करुन जंगलात नेले. मुलीच्या मोठ्या बहिणीने अपहरणाची माहिती पोलिसांना दिल्यावर एकच खळबळ उडाली. हुडकेश्वर, बेलतरोडी आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी आरोपीला तीन तासांत अटक केली व अपहृत मुलीला सुखरुप पालकांच्या स्वाधीन केले. महेशकुमार शाहू (२८) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी ३५ वर्षीय महिली पतीपासून विभक्त राहते. तिला दोन मुली आहेत. ही महिला महेशसोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये होती. दोन दिवसांपूर्वी महिला आजारी बहिणीला भेटायला मध्यप्रदेशात गेली होती. घरी दोघी बहिणीच होत्या. मंगळवारी सकाळी आरोपी ट्रक चालक महेशने चिमुकलीला सोबत घेतले, ट्रकमध्ये बसवले व शहरातून पळ काढला. त्या मुलीच्या मोठ्या बहिणीला ही बाब समजताच तिने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता नियंत्रण कक्षाला माहिती दिली. मुलीला घेऊन महेश थेट इंसारा सिटी रोडवरील जंगलात गेला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रमेश ताले, अविनाश जायभाये, बेलतरोडीचे ठाणेदार मुकुंद कवाडे आणि हुडकेश्वरचे ठाणेदार कैलास देशमाने यांनी लगेच पथके तयार केली आणि मुलीची शोधाशोध सुरु केली. पोलिसांनी काही तासांतच ट्रकचा शोध घेतला. ट्रक इसासनी सीटी रोड, हुडकेश्वर येथे मिळून आला. पथकाने जवळपास शोध घेतला असता ट्रक चालक आणि अपहृत मुलगी निर्जन स्थळी होते. पथकाने अपहृत मुलीला ताब्यात घेवून ट्रक चालकाला ठाण्यात आणले. अपहृत मुलीच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाविरूध्द गुन्हा नोंदविला.
हेही वाचा… ‘साऊथ मे भाजप साफ, नॉर्थ मे भाजप हाफ’, खासदार इमरान प्रतापगडी म्हणतात…
अपहरणाचे कारण अद्याप गुलदस्त्यात
सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार अपहृत मुलीचे वडिल वेगळे राहतात. वडिलांना मुलीला भेटण्याची तीव्र इच्छा होती. ते मुलीला भेटण्यासाठी जाणार होते. हीच संधी पाहून आरोपी ट्रक चालकाने मुलीला पळविले आणि जंगलात नेले. बालिकेचे अपहरण करण्यामागचे कारण काय, तिला कुठे घेऊन जाणार होता, तिच्यासोबत काही बरेवाईट केले का, याचा खुलासा पोलीस तपासात होईल.