नागपूर : दोघेही नोकरीवर असल्यामुळे ९ महिन्यांच्या बाळाला सांभाळायला एका तरुणीला ठेवले. मात्र, तरुणीने त्या बाळाला मारहाण करुन चिमटे काढत असल्याची बाब बाळाच्या आईच्या लक्षात आली. त्यामुळे तिने गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
तक्रारदार महिला व तिचा पती दोघेही नोकरी करतात. तिला ९ महिन्यांचा मुलगा असून त्याला सांभाळण्यासाठी तिने एका मजूर पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून एका तरुणीला कामावर ठेवले. तर घरकाम करण्यासाठी आणखी एका तरुणीला ठेवले. अंकू नावाची तरुणी ही बाळाला सांभाळायची तर दुसरी तरुणी घरची कामे करायची.
हेही वाचा >>>आंब्याच्या किंमती नागपुरात कां वाढल्या, ही आहेत कारणे
दोघीही २४ तास महिलेकडेच रहायच्या. २५ एप्रिल रोजी महिलेला दुसऱ्या खोलीतून बाळाच्या रडण्याचा आवाज आला. ती तिथे गेली असता अंकू त्याला मारत होती. तर मुलाच्या पोटाला चिमटे घेण्याचे व्रणही दिसले. महिलेने विचारणा केली असता अंकूने आक्रमक झाली. दुसऱ्या तरूणीला विचारणा केली. ‘बाळाला दिवसा झोप येऊ नये म्हणून अंकू ही चिमटे काढत होती. रात्री बाळ रडले तर सांभाळण्यासाठी आपल्याला त्रास होऊ नये, असे ती सतत म्हणत असल्याचे तिने सांगितले.महिलेला धक्का बसला. तिने गिट्टीखदान ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला.