नागपूर : गेल्या तीन वर्षांपासून नागपुरात अल्पवयीन मुला-मुलींच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. हा विषय पालकवर्गांसाठी चिंतेचा असून क्षणिक राग, अभ्यास, परीक्षेची भीती आणि प्रेमप्रकरणांमुळे अल्पवयीन मुले-मुली आत्महत्या करीत असल्याचे समोर आले आहे. अशातच गेल्या ४८ तासांत दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. यापूर्वी, तीनच दिवसांपूर्वी प्राजक्ता शेंडे नावाच्या मुलीने स्वत:चा गळा चिरुन आत्महत्या केली होती. वर्धा मार्गावरील एका बारावीच्या विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर आता या घटना घडल्याने विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. एका अल्पवयीन विद्यार्थिनीने विष प्राशन करत आत्महत्या केली. याशिवाय अभ्यासाच्या तणावामुळे दहावीतील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. पारडी व जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या आहेत.
अनुष्का तुलसीदास लांडगे ही अकरावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती. तिचे वडील वाहनचालक आहेत. तर आई गृहिणी आहे. तिला एक लहान भाऊ आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुष्का ही नेहमी मोबाईल फोनवर व्यस्त राहत होती. तिला सोशल मीडियावर सक्रिय राहण्याची सवय होती. तिच्या पालकांनी तिला मोबाईल पाहण्याऐवजी अभ्यास करण्याचा सल्ला दिला होता. यानंतर काही वेळातच अनुष्काने रविवारी कीटकनाशक प्राशन केले. तिची प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात नेले असता तिला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण समोर येऊ शकलेले नाही. मात्र, तिने मोबाईल न दिल्याच्या संतापातून हे टोकाचे पाऊल उचलले का ? या दिशेने तपास सुरू आहे. मनमिळावू अनुष्काच्या आत्महत्येमुळे समाजमन हेलावले आहे.
दुसरी घटना जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. जरीपटका येथील अमरज्योती नगरमध्ये ही घटना घडली. १५ वर्षांचा प्रणव किरणकुमार बोरकर हा दहावीचा विद्यार्थी होता. त्याचे वडिल बँकेत कर्मचारी आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणवची परीक्षा २८ फेब्रुवारीपासून सुरू होणार होती. त्याचे शालेयस्तर परीक्षेतील दोन पेपर तो देऊ शकला नव्हता. त्यामुळे त्याला अभ्यासाचा ताण सहन होत नव्हता. मागील काही कालावधीपासून त्याच्यातील चिडचिडपणा वाढला होता. शनिवारी तो बाथरूममध्ये गेला. तो बराच वेळ बाहेर न आल्याने त्याच्या आईने हाक मारली. तिला संशय आल्यावर तिने पतीला सांगितले. जेव्हा ते घरी पोहोचले आणि दरवाजा तोडला तेव्हा मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. ते पाहून पालकांनी हंबरडाच फोडला. घटना उघडकीस आली. जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सलग तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यामुळे पालकवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.