नागपूर : शहरातील इमामवाडा आणि सक्करदरा परीसरात घडलेल्या दोन घटनांमध्ये विजेचा धक्का लागून पाच वर्षीय चिमुकलीसह दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पहिली घटना सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. शुभम विठ्ठल मेश्राम (२४) हा मूळचा रोहना भीवापूर येथील रहिवासी असून सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका रुग्णालयात काम करतो. इमारतीमधील पाण्याची मोटर बंद करण्यासाठी तो गेला होता. त्याला विजेच्या वायरला स्पर्श होताच त्याला जबर धक्का बसला. त्यामुळे तो भींतीवर फेकल्या गेल्याने बेशुध्द पडला. त्याला लगेच रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
हेही वाचा : नागपूर: तळपत्या उन्हातही टेकडी गणपती मंदिर परिसर थंडा थंडा कुल कुल… स्प्रिंकलरमुळे भाविक गारेगार…
इमामवाड्यात घडलेल्या दुसऱ्या घटनेत, आकांक्षा सचिन संदेले (वय ६, बोरकरनगर) ही दुपारी घरात खेळत होती. खेळताना तिचा हात चालू कुलरला लागला. कुलरच्या वायरचा धक्का लागल्यामुळे आकांक्षा खाली फेकल्या गेली. तिला कुटुंबियांनी लगेच मेडिकल रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी इमामवाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.