नागपूर : दुचाकीवरून तीन अल्पवयीन मुली जात असताना दोन महिला वाहतूक पोलिसांना संशय आला. त्यांना थांबवून चौकशी केली. मुलींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संशय बळावला. मुलींना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तीनपैकी दोन मुली चक्क हत्याकांडातील असून एक चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तपासाअंती तिघींनीही छत्तीसगढमधील बालसुधारगृहाची महिला वॉर्डन आणि महिला पोलिसांना खोलीत डांबले आणि पैसे, दुचाकी घेऊन पळ काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली. तीनही मुलींना छत्तीसगढ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. शनिवारी वाहतूक शाखा लकडगंज झोन अंर्तगत वर्धमाननगर चौकात कर्तव्यावर असलेल्या पोलीस हवालदार वैशाली दुरूगकर व पोलीस अंमलदार पूजा या कर्तव्यावर होत्या. त्यांना नंबर प्लेट नसलेल्या एका अॅक्टिव्हा दुचाकीवर तीन मुली, विना हेल्मेट संशयितरित्या येताना दिसल्या. त्यांनी मुलींना थांबविले. त्यांची चौकशी केली असता त्या समाधानकारक उत्तरे देत नव्हत्या.

हेही वाचा >>>अमरावती : कारागृहातील मित्राच्‍या वाढदिवसानिमित्‍त फेकले बॉम्‍बसदृश्‍य फटाके, दोघांना अटक; पोलिसांनी…

 त्यांच्यावर संशय बळावल्यामुळे अंमलदाराने वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देत मुलींना पोलीस ठाण्यात नेले. त्यांची सविस्तर चौकशी केली असता तीनही मुली अल्पवयीन असून त्या ५ जुलैला रात्री ७.४५ वाजताच्या सुमारास राजनांदगाव, छत्तीसगढ येथील बालसुधारगृहातून पळून आल्याचे सांगितले. त्यांनी बालसुधारगृहातील वार्डन व महिला पोलिसांना एका रूममध्ये बंद केले. त्यानंतर त्यांचा भ्रमणध्वनी, दुचाकी व काही रोख रक्कम चोरी करून बालसुधारगृहातून पळ काढला. यातील दोन मुलींवर हत्येसह अन्य गंभीर गुन्हे दाखल आहे. तिन्ही मुली न्यायालयीन कोठडीत, महिला बाल सुधारगृहात असताना तेथून पसार झाल्या होत्या. या प्रकरणी छत्तीसगढ पोलिसांना सूचना केल्यानंतर त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

खिडकी तोडून वॉर्डन पडली बाहेर

दोन मुलीवर खुनाचा तर एका मुलीवर जबरी चोरी केल्याचा आरोप आहे. अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधार गृहात ठेवण्यात आले. पाच जुलैच्या रात्री खोलीत आग लागल्याची खोटी बातमी पसरवून तिन्ही मुलींनी आरडा ओरड केली. तत्पूर्वी त्यांनी खोलीत ऑईल टाकले. महिला वॉर्डन धावत येताच मुलींनी त्यांना खोलीत ढकलले आणि बाहेरून दार बंद केले. मुलींनी त्यांचीच दुचाकी घेऊन पळाले. दोन वर्षांच्या बाळासह वॉर्डन खोलित बंद होती. तिचे बाळ रडत होते. खिडकी तोडून वॉर्डन बाहेर पडली आणि ही घटना पुढे आली.

दुचाकी ठेवा, कागदपत्र घरून आणतो

वाहतूक पोलिसांनी त्यांना वाहनाचे कागदपत्रे मागितले असता, वाहन ठेवा कागदपत्रे आणून देतो. अशी त्यांनी थाप मारली. अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडल्याचे लक्षात येताच पाच हजाराचा दंड भरण्याची तयारी दाखविली. पोलिसांना दोनशे रुपये देण्याचाही प्रयत्न केला. पोलिसांनी एका मुलीच्या आईशी संपर्क साधला असता सार प्रकार उघडकीस आला. मुली भंडाऱ्याला जाणार होत्या. काही तरी विपरीत घडण्यापूर्वीच वाहतूक पोलिसांनी पकडले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur two girls were accused of murder and one girl was accused of forced theft adk 83 amy
Show comments