नागपूर : वेगवेगळ्या घटनांमध्ये पाचपावली व यशोधरानगर हद्दीतून दोन अल्पवयीन मुले खेळता-खेळता अचानक बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना समोर आली. यातील एक मुलगा १० वर्षांचा तर दुसरा १६ वर्षांचा आहे. विशेष म्हणजे, दोन्ही घटना एकाच दिवशी घडल्याने दोन्ही मुलांच्या बेपत्ता होण्यामागे एखादी टोळी असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पहिली घटना पाचपावली हद्दीत उघडकीस आली. शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास १६ वर्षीय मुलगा घरासमोर खेळत होता. खेळता-खेळता तो अचानक बेपत्ता झाला. कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला, मात्र तो कुठेही मिळाला नाही. शेवटी त्याला कोणीतरी फूस लावून पळवल्याच्या संशयातून पोलिसात तक्रार करण्यात आली.
दुसऱ्या घटनेत यशोधरानगर हद्दीत राहणारा १० वर्षीय मुलगा शुक्रवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घराजवळ खेळत होता. तो सुद्धा खेळता-खेळता अचानक बेपत्ता झाला. बराच वेळ होऊनही मुलगा घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. आसपासच्या परिसरात त्याला शोधल्यानंतर सर्व परिचित व नातेवाईकांकडे त्याचा शोध घेण्यात आला, मात्र तो मिळाला नाही. शेवटी त्याला कोणीतरी फुस लावून पळविल्याचा संशयातून पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.