नागपूर : उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात पारपत्र (पासपोर्ट) पडताळणी पूर्ण करण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारताना हुडकेश्वर पोलीस ठाण्यात कार्यरत दोन पोलीस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतंबिधक विभागाच्या पथकाने (एसीबी) बुधवारी रंगेहात पकडले. पोलिसांनी या प्रकरणात दोघांवर लाचखोरीचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. राहुल दत्तात्रय महाकुळकर (पोलीस हवालदार), नितीन पुरुषोत्तम ढबाले (पोलीस शिपाई) अशी आरोपींची नावे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एसीबीच्या माहितीनुसार, तक्रारदार हुडकेश्वर पोलीस ठाणे परिसरात राहतो. त्याने पारपत्र पडताळणीसाठी अर्ज केला होता. त्यासाठी पोलीस पडताळणीची गरज असते. त्यामुळे तक्रारकर्ता हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गेला. येथे त्याला पारपत्र पडताळणीची प्रक्रिया करून संबंधित विभागाला पाठवण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागण्यात आली. तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्याने थेट एसीबी कार्यालयाकडे तक्रार दिली. एसीबीच्या सूचनेनुसार सापळा रचण्यात आला. त्यानुसार दोन हजार रुपयांची लाच घेताना दोन्ही आरोपींना हुडकेश्वर पोलीस ठाण्यातच रंगेहात पकडण्यात आला.

हेही वाचा : माघ मासातील स्नान महात्म्य; काय आहे पुराणातील सार जाणून घ्या

दोन्ही आरोपी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुप्तचर विभागात कार्यरत होते. दरम्यान नागपूरकर असलेले देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सध्या उपमुख्यमंत्री व गृहमंत्री पदाची जबाबदारी आहे. त्यामुळे भविष्यात या पद्धतीचे प्रकरण थांबवण्यासाठी फडणवीस व त्यांचे गृह खाते काय कारवाई करणार याकडे संपूर्ण नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur two police arrested by acb while accepting bribe of rupees 2000 mnb 82 css