नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या करोनानंतर परीक्षांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला होता. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी काही अधिसभा सदस्यांनी केली होती. त्यावर अधिष्ठाता डॉ. संजय कविश्वर यांची चौकशी समितीही लावण्यात आली होती. त्यांनी आपला अहवाल तयार करून तो फेब्रुवारी २०२४ मध्ये कुलगुरूंकडे जमा केला. मात्र, अद्याप उघडूनही पाहिला नाही. तो कुलगुरू कक्षातील कपाटात अद्यापही दडवून ठेवण्यात आल्याने निलंबित झालेले कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या कपाटाचे कुलूप तोडले तर अनेक अहवालांमधील गुपीत उघड होतील, अशी मागणीच अधिसभा सदस्य विष्णू चांगदे यांनी केली. या मागणीला सदस्य ॲड. मनमोहन वाजपेयी यांनीही दुजोरा दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोमवारी झालेल्या अधिसभेच्या बैठकीमध्ये परीक्षेचा गोंधळ आणि चौकशी समितीच्या अहवालावरून बरीच चर्चा झाली. यावेळी चांगदे यांनी बोलताना ही माहिती दिली. नागपूर विद्यापीठाच्या करोनानंतर झालेल्या परीक्षांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला होता. यावेळी अनेक परीक्षांचे निकाल हे सहा महिन्यांपर्यंत जाहीर झाले नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला होता. विधिमंडळामध्येही हा विषय चर्चेला आला होता. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठामध्ये येऊन याचा आढावा घेतला होता. तसेच परीक्षांचे काम पाहणाऱ्या एमकेसीएल कंपनीकडून कामही काढून घेण्यात आले होते. यानंतर काही अधिसभा सदस्यांनी कुलगुरू चौधरी यांना निवेदन देत या संपूर्ण गोंधळाची चौकशी करावी अशी मागणी केली.

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात भाषणाची संधी न दिल्याने आमदार जोरगेवार नाराज

२१ फेब्रुवारी २०२३ मध्ये यावर निर्णय होऊन डॉ. कविश्वर यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल कुलगुरू डॉ. चौधरी यांच्याकडे जमा केला होता. मात्र, सहा महिने उलटूनही अद्याप यावर कारवाई झालेली नाही. त्यामुळे बैठकीदरम्यान याची विचारणा केली असता विद्यापीठाला स्वत: या अहवालाविषयी माहिती नव्हती. डॉ. कविश्वर यांनी संपूर्ण चौकशी करून अहवाल कुलगुरूंकडे जमा केल्याचे सांगितले. मात्र, यावर प्रशासनाकडे कुठलेही ठोस उत्तर नव्हते. शेवटी चांगदे यांनी जुन्या कुलगुरूंच्या कपाटाचे कुलूप तोडा, अनेक अहवाल बाहेर निघतील अशी मागणी केली. शेवटी प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी मध्यस्थी करून पुढील बैठकीमध्ये अहवालाची संपूर्ण माहिती देणार असे आश्वासन दिले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur university assembly student leader demand to open the cupboard of suspended vice chancellor subhash chaudhary dag 87 css