नागपूर : अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान नागपूर जिल्ह्याकरिता हवामान खात्याने २९ व ३० नोव्हेंबरसाठी ‘यलो अलर्ट’ दिला आहे. राज्याच्या उत्तरेकडे पावसाने उसंत घेतली आहे. विदर्भात अवकाळी पावसाचे थैमान सुरू आहे. विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी असेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रविवारी रात्रीपासूनच विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला. काही ठिकाणी गारपीट तर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. यामुळे शेकडो जनावरे सुद्धा दगावली. दरम्यान, मंगळवारी नागपूर जिल्ह्याला “ऑरेंज अलर्ट” देण्यात आला होता. सकाळपासूनच जिल्ह्यातील काही भागात गारपीट तर काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. आता बुधवार आणि गुरुवारी देखील हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यासाठी “यलो अलर्ट” दिला आहे. बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह वीज गर्जना होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : उपराजधानीत अनैतिक संबंधातून सर्वाधिक हत्याकांड, ६९ पैकी ३४ खूनांमध्ये प्रेमप्रकरण आणि विवाहबाह्य संबंध

पावसामुळे तापमान देखील मोठ्याप्रमाणात घट होऊन वातावरणात गारठा निर्माण होणार आहे. या अनुषंगाने नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक असून चुकून सुद्धा झाडाखाली उभे राहू नये. नदी व नाल्याच्या पुलावरून जर पाणी वाहत असेल तर धाडस करून कुठल्याही प्रकारे पुल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करावे व स्वसंरक्षणासाठी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur unseasonal rain forecast yellow alert for next 2 days in vidarbh central maharashtra and marathwada rgc 76 css