नागपूर : भारतीय हवामान खात्याने येत्या २४ तासात विदर्भ, मराठवाड्यासह देशभरात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. शनिवारी देखील अनेक भागात पाऊस झाला असून रविवारी देखील पावसाचा अंदाज कायम आहे. विदर्भ आणि मराठवाड्यासह मुंबईत देखील हवामान खात्याने पावसाचा अंदाज दिला आहे.
मुंबईसह विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. येत्या २४ तासात राज्यात काही भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. तसेच विजांच्या कडकडाटासह गारपीटीचा देखील इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मुंबई, नवी मुंबई, पालघरसह ठाणे जिल्ह्यातही काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा : एमपीएससीतर्फे नवीन पदभरती जाहीर; या पदांसाठी करता येणार अर्ज
गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. नागपूर शहरात शनिवारी रात्री पावसाने हजेरी लावली. तर रविवारी सुद्धा सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. याशिवाय विदर्भातील अनेक जिल्ह्यात हीच स्थिती आहे. मराठवाड्यात देखील अवकाळी पाऊस कायम आहे. तर आता भारतीय हवामान खात्याने राज्याच्या राजधानीत पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईत काही भागात पावसाची शक्यता आहे. तर पुढील तीन दिवस हा पाउस कायम असणार आहे.
हेही वाचा : आघाडीत बुलढाणा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येणार ?
रविवारी मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रशिवाय जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडच्या अनेक भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस किंवा बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिल्ली, पंजाब, पश्चिम उत्तर प्रदेशसह इतर प्रदेशांसह अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे.