नागपूर: केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर हा गृहजिल्हा आहे. त्यांच्या जिल्ह्यात अपघाती मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. या मृत्यूच्या आडदेवरीबाबत आपण जाणून घेऊ या. नागपूर शहराच्या तुलनेत नागपूर ग्रामीण भागात १ जानेवारी २०२४ ते ३१ ऑक्टोबर २०२४ दरम्यान अपघाती मृत्यूंचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे अपघाती मृत्यू रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपायांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ही आकडेवारी नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण पोलीस विभागाकडून अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांना उपलब्ध केली गेली आहे.
अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांच्या माहितीनुसार, शहर पोलीस ठाणे हद्दीत १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०२४ दरम्यान १ हजार ४१ अपघातांची नोंद झाली. त्यामध्ये २८६ नागरिकांचा मृत्यू झाला. याच काळात ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत ७३८ अपघात झाले. त्यामध्ये ३४३ नागरिकांचा मृत्यू झाला. सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारातून ही माहिती पुढे आणली. शहरात अपघातांची संख्या सर्वाधिक असली तरी कमी अपघातातही ग्रामीण भागात मृत्यूंची संख्या जास्त असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अपघात नियंत्रणासाठी ब्लॅक स्पाॅट कमी करण्यासह रस्ते सुधार, वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे काटेकोर पालन होणे गरजेचे आहे.
हेही वाचा : नागपूरचे विमानतळ भटक्या श्वानांच्या ताब्यात, नितीन गडकरी देणार का अधिकाऱ्यांना तंबी…
नागपुरात अपघाताची कारणे…
- वेगाने वाहन चालिवणे
- धोकादायकरित्या वाहन चालविणे, राँगसाइडने वाहन चालविणे
- वाहनातील बिघाड,
- वाहनावरील नियंत्रण सुटणे, खड्डे, खराब रस्त्ये, वाहतूक सिग्नल नसणे
हेही वाचा : महसूल खात्यातील बदल्यांबाबत बावनकुळे म्हणाले, “आता पैसे देऊ…”
अपघात नियंत्रणाबाबत…
शहरातील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी जवळपास सर्वच रस्ते प्रशस्त केले आहेत. जनाक्रोश संस्था सातत्याने वाहनचालकांची जनजागृतीचे विविध प्रकारे काम करीत आहेत. राजू वाघ जीवन सुरक्षा प्रकल्पाच्या माध्यमातून विविध प्रकारे काम करत आहे. रार्ष्ट्रीय आणि राज्य रस्ते विकास मंडळातर्फे ब्लॅक स्पॉट शोधल्या जात आहेत. अपघात टाळण्यासाठी वळण मार्ग सरळ केले जात आहे. या सर्व प्रयत्नांमागे अपघात मुक्त शहर करण्याचा उद्देश असला तरी अपघात वाढत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या अपघातांकरिता रस्त्याला दोष द्यायचा की वाहनचालकांना असा प्रश्न यंत्रणांना पडला आहे. नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीणचे वाहतूक पोलिसांसह आरटीओकडूनही विविध प्रकारे एकीकडे जनजागृती तर दुसरीकडे कारवाई केली जात आहे. त्यानंतरही धक्कादायक स्थिती जिल्ह्यात दिसत आहे.
पोलीस ठाणे अपघात मृत्यू
नागपूर शहर १,०४१ २८६
नागपूर ग्रामीण ७३८ ३४३