नागपूर : विदर्भातून तांदळाची निर्यात मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे येथे तांदळाच्या विविध प्रजातींवर संशोधन करणारी संस्था उभी राहिली पाहिजे, यासाठी आमचा आग्रह राहणार आहे. एवढेच नव्हेतर नजिकच्या काळात विदर्भात १०० नवे लघुद्योग सुरू व्हावे यासाठी संघटनेचे प्रयत्न राहतील, अशी माहिती विदर्भ इकॉनॉमिक डेव्हल्पमेंट (वेद) कौन्सिलच्या नवनियुक्त अध्यक्ष रिना सिन्हा यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.
वेद कौन्सिलची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. त्यामध्ये २०२४ ते २०२६ साठी नवीन कार्यकारिणी घोषित झाली असून अध्यक्षपदी सर्वानमुते रिना सिन्हा यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी संवाध साधला. त्या म्हणाल्या, खाण उत्खनन, मिहान, पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स आणि रिफायनरी याबाबत संघटना कायम प्रयत्नशिल आहे. नागपूरात उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहे. त्या सुविधांचा लाभ जगभरातील रुग्णांना व्हावा. तसेच त्या माध्यमातून नागपूरात वैद्यकीय पर्यटन उभे राहावे, यासाठी प्रयत्न होणार आहे. व्हिसामुक्त प्रवेशाचे धोरण अंगिकारल्यास जगभरातील रुग्ण नागपुरात येऊन वैद्यकीय उपचार घेऊ शकतील. असे धोरण तयार करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.
हेही वाचा : ‘वसुंधरा दिवस’ साजरा होत असताना यवतमाळात ४० वृक्षांची कत्तल! विश्रामगृहात विनापरवानगी वृक्षतोड
अशी आहे कार्यकारिणी
रिना सिन्हा या वेद कौन्सिलच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. त्यांच्या कार्यकारिणीमध्ये देवेंद्र पारेख (मावळते अध्यक्ष), पंकज महाजन, बी. के. शुक्ला आणि राहुल उपगन्लावर (उपाध्यक्ष), अमित पारेख (सरचिटणीस), वरुण विजयवर्गी (कोषाध्यक्ष), दिनेश नायडे, आशिष शर्मा आणि अमित येनुरकर (सहसचिव) यांचा समावेश आहे.