नागपूर : विदर्भातील शेतकरी मरतोय पण सरकार गप्प आहे. कापूस, सोयाबीनला भाव मिळत नसल्याने यवतमाळ जिल्ह्यातील सचिन बहादूरे या शेतकऱ्याने मंगळवारी विधानभवन परिसरात किटक नाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे मी आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून तातडीने या मुद्यावर चर्चा करण्याची मागणी केली. मात्र सरकारने ती धूडकावून लावली, असा आरोप करीत राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टीका केली.
हेही वाचा : “मोदी सरकार लोकशाहीचा खून करतंय”, खासदार निलंबनावरून नाना पटोले यांची टीका, म्हणाले…
विधान भवन परिसरात पत्रकारांशी ते बोलत होते. देशमुख पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या मुद्यावर हे सरकार मूग गिळून गप्प बसल्याचा आरोप करीत देशमुख म्हणाले, विदर्भात अधिवेशन होत असल्याने विदर्भाच्या मुद्यावर चर्चा व्हावी, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत या मागणीसाठी सचिन बहादूरेने किटक नाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. कापूस, सोयाबिन, धान, तूरीला भाव मिळत नसल्याने विदर्भात आजही मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. गेल्या वर्षभरात ४०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तरीही सरकार शांत आहे, असा टोलाही देशमुख यांनी लगावला.