नागपूर : महाराष्ट्रात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता असून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने या राज्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांंचे दौरे वाढले आहेत. अलिकडेच अमित शाह नागपुरात येऊन गेले, पण नेमके त्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शहराबाहेर होते. या घटनाक्रमांवर विरोधीपक्षांनी काही शक्यता व्यक्त केली आहे.

देशाची आर्थिक राजधानी मुंबई असलेले राज्य कोणाला नको असेल? शिवाय या राज्यातील विजय देशात वेगळा संदेश देतो. लोकसभा निवडणुकीतील चित्र महाराष्ट्रातील महायुती सरकारसाठी चिंतेची बाब आहे. महाविकास आघाडीला ही निवडणूक ऊर्जा देऊन गेली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष जोशात असले तरी महायुतीने कुठलीही कसर सोडणार नसल्याचे दाखवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या महिनाभरापासून केंद्र आणि राज्य सरकार वेगवेगळ्या योजनांची घोषणा करीत आहे. तसेच विविध प्रकल्पाचे भूमिपूजन, लोकार्पणाचा धडाका लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या वाऱ्या करीत आहेत. याशिवाय भाजपने संघटनात्मक पातळीवर केंद्रीय मंत्र्यांची महाराष्ट्रात नियुक्ती केली आहे.

हेही वाचा : नागपूर : ती ‘फाईल’ बंद! नागपूर विमानतळाबाबत सर्वोच्च न्यायालयाने…

लोकसभेत भाजपला विदर्भाने झटका दिला. भाजपला नागपूर आणि अकोला अशा दोन जागा मिळाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे लोकसभेतील अपयश झटकून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. या बैठकीला विदर्भातील सर्व ६२ मतदारसंघातून प्रमुख पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. बैठकीला महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्रसिंह यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. परंतु नागपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या बैठकीला उपस्थित नव्हते. याकडे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी नागपुरात पत्रकारांचे लक्ष वेधले आणि मोदी, शहा जेव्हा येतात तेव्हा गडकरी गायब असतात, अशी मिश्कील टिप्पणी केली.

हेही वाचा : चंद्रपूर: घुग्घुसवासियांचा श्वास प्रदूषणामुळे गुदमरणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघातील कन्हान येथे प्रचारसभा घेतली होती. परंतु नागपुरात त्यांची एकही सभा झाली नव्हती. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी प्रचारसभा घेतल्या. मात्र, नागपूर लोकसभा मतदारसंघात प्रचारसभा घेतली नव्हती. वडेट्टीवार यांना मोदी, शाह यांची लोकप्रियता कमी झाल्याचे सांगायचे होते की गडकरी यांना मोदी आणि शाह यांच्या राजकारणाची शैली पसंत नसल्याचे सांगायचे होते, यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा झडत आहेत.