नागपूर : राज्यात आता गुंडाराज सुरू झाला आहे. सत्ताधाऱ्यांचे गुंड रस्त्यावर फिरताना कायदा हातात घेत आहेत. पत्रकार निखील वागळे यांनी जे काही वक्तव्य केले असेल, त्याचे आम्ही समर्थन करीत नाही. परंतु त्यांच्या वक्तव्यावर संतापून कायदा हातात घेऊन त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करणे हे योग्य नाही. त्यांचे विधान अयोग्य आहे, असे वाटत असेल तर सभा घेऊन वागळेंचे मुद्दे खोडून काढा. पण, त्यांचा आवाज कुणाला दाबता येणार नाही. सत्ताधाऱ्यांची गुंडगिरी विकोपाला गेली आहे. ती वेळीच आवरली नाहीतर एकदाचा बिहार परवडला पण महाराष्ट्र नको, अशी स्थिती निर्माण होईल आणि त्यासाठी जबाबदार हे त्रिकुटाचे सरकार असेल, असा घणाघात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. ते आज नागपुरात बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : धक्कादायक! दलित मुलीवर प्रेम केल्याने वडिलांनी मुलाला संपवले; बनाव रचला, पण पोलीस तपासात…

राज्यातील पोलिसांत असंतोष आहे. पोलिसांचे नैतिक खच्चिकरण गेले जात आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये पोलिसांना आदेश देण्याची स्पर्धा लागली आहे. शिंदे, फडणवीस आणि पवार वेगवेगळे आदेश पोलिसांना देतात. पोलिसांच्या पुढे प्रश्न असतो की काय नेमके करायचे. एकाच घटनेबाबत हे तिघे वेगवेगळे वक्तव्य करतात. कोणी आरोपीवर कारवाई करा म्हणतो, कोणी आरोपीला सोडा म्हणतो तर कोणी कडक कारवाई करून तो सुटलाच नाही पाहीजे, असे आदेश देतो. त्यामुळे पोलीस काही करू शकत नाहीत. पोलीस हे आता सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले झाले आहेत. सत्ताधाऱ्यांकडून त्यांचा वाट्टेल त्या प्रकारे वापर केला जात आहे. पोलीस दबावामुळे कायद्याने काम करीत नाहीत. त्यामुळे गुंडगिरी फोफावलेली आहे. पोलिसांना मोकळीक देणे आवश्यक आहेत. पोलीस प्रशासन हतबल झाल्यासारखे वागत आहे. हे राज्याच्या दृष्टीने घातक आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.

हेही वाचा : राज्याच्या ‘या’ भागांमध्ये विजांसह पावसाचा अंदाज, हवामान खात्याकडून ‘येलो अलर्ट’

एका गुंडाचे मुख्यमंत्र्यासोबतचे छायाचित्र शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी एक्स (ट्विट) केले. त्याबाबत वडेट्टीवार म्हणाले, मुख्यमंत्री कार्यालयात, मुख्यमंत्र्याजवळ जाण्याची हिंमत काय करतात. हे गुंड मंत्रालयापर्यंत कसे जाऊ शकतात. त्यांना येथे सुरक्षित वाटते काय, त्यांना येथे कोण घेऊन येतो, त्याचीही चौकशी झाली पाहिजे, असेही वडेट्टीवार म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur vijay wadettiwar said that goons and gangsters feel safe in cmo rbt 74 css