नागपूर : उन्हाळ्याची सुरुवात यंदा नेहमीपेक्षा महिनाभर आधीच झाली. फेब्रुवारीच्या मध्यान्हापासूनच ऊन तापायला लागले आणि मार्च महिन्यात दोनदा उष्णतेच्या लाटांचा इशारा मिळाला. वाढत्या तापमानाच्या पाऱ्यामुळे जेथे मानवी वस्तीत जलसंकट निर्माण झाले आहे, तिथे जंगलातील वन्यप्राण्यांवरसुद्धा जलसंकट उद्भवण्याची स्थिती आहे. मात्र, यामुळे वन्यप्राण्यांना बाहेर भटकंती करण्याची वेळ येऊ नये यासाठी वनखात्यानेच पावले उचलली आहेत. जंगलात नैसर्गिक पाणवठे तर आहेत, पण वाढता उन्हाळा लक्षात घेता ते कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अतिशय वेगळ्या पद्धतीने श्रमदानातून पेंच व्याघ्रप्रकल्पात पाणवठ्यांची निर्मिती करण्यात येत आहे.

उन्हाळ्यात वन्यप्राणी पाण्यासाठी भटकंती करतात. वाघ बिबट यासारख्या मांसभक्षी प्राण्यांसह तृणभक्षी प्राणी देखील पाण्याच्या शोधात गावाकडे येतात. त्यामुळे या काळात मानव-वन्यजीव संघर्ष, शेती पिकांचे नुकसान, शिकार यासारख्या घटना घडतात. पाण्याच्या शोधात हे प्राणी विहिरीत पडतात. त्यासाठीच या कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. उन्हाळ्यात दरवर्षी जंगलात वन्यप्राण्यांसाठी पाणवठे तयार केले जातात. या उपक्रमात महाराष्ट्रातील पेंच व्याघ्रप्रकल्पाच्या पूर्व वनक्षेत्रात देखील उन्हाळ्यात वन्यप्राणी आणि पक्ष्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, हे पाणवठे अतिशय कमी किमतीत आणि श्रमदानातून बांधण्यात आले आहेत.

याच उपक्रमाचा एक भाग म्हणून पूर्व पेंच वनक्षेत्राच्या प्रत्येक भागात श्रमदानातून कमी खर्चातील असा एक पाणवठा बांधण्यात येणार आहे. सिल्लारी येथील अमलतास पर्यटन संकुलात श्रमदान मोहीम सुरू करण्यात आली. ज्या ठिकाणी नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नाही अशा ठिकाणी वन्यप्राणी आणि पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी एकूण ३४ पाणवठे बांधले जात आहेत. या पाणवठ्यांसाठी जागादेखील काळजीपूर्वक निवडण्यात आल्या आहेत.

झाडांची सावली ज्या ठिकाणी राहील, अशी ठिकाणे कृत्रिम पाणवठ्यासाठी निश्चित करण्यात आली आहेत. ज्यामुळे तहान भागवण्यासाठी येणाऱ्या वन्यप्राणी आणि पक्ष्यांना झाडांची सावली मिळेल. तसेच उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन कमीत कमी होऊन वन्यप्राणी आणि पक्ष्यांना विश्रांतीसाठी जागा मिळेल, या सर्वांचा विचार करूनच ही मोहीम राबवण्यात येत आहे. या आव्हानात्मक परिस्थितीत वन्यजीवांना अत्यंत आवश्यक असलेले जलस्रोत उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.