नागपूर : अवकाळी पावसामुळे उन्हाळा जाणवत नसला तरी धरणातील जलस्तर मात्र खालवत चालला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मे महिन्यात मोठ्या धरणातील पाणी साठा ४ टक्क्याने तर मध्यम प्रकल्पातील साठा ५ टक्क्याने कमी झाला आहे. नागपूर विभागात एकूण १६ मोठे प्रकल्प आहे. मागच्या वर्षी म्हणजे १९ मे २०२३ ला या प्रकल्पांमध्ये ४३.७९ टक्के पाणी होते. यंदा १९ जूनला ३९ टक्के म्हणजे चार टक्के खाली आला आहे. विभागात ४२ मध्यम प्रकल्प आहेत.त्यात मागच्या वर्षी मे महिन्यात ४४.७७ टक्के पाणी होते. यंदा १९ मेला ३९.४३ टक्के म्हणजे पाच टक्के कमी झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह धरणात मागच्या वर्षी ५९ टक्के पाणी होते यंदा ५०.३८ टक्के आहे. हीच स्थिती वडगाव धरणाची आहे. तेथे मागील वर्षी याच काळात ३८ टक्के पाणी होते यंदा ते ३४ टक्के आहे. नांद धरणात यंदा ७.७७ टक्के पाणी आहे, मागच्या वर्षी याच काळात या धरणात १९ टक्के पाणी होते.
पूर्व विदर्भात नागपूर हे प्रमुख शहर असून २५ लाख लोकसंख्या असलेल्या या शहराला पेंच धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या धरणातील जलस्तर कमी कमी होऊ लागला आहे. मे महिन्यात उन्हाळा तीव्र असल्याने बाष्पिभवनामुळे जलस्तर कमी होतो, यंदा उन्हाळ्याची तीव्रता नाही, उलट अवकाळी पाऊस पडतो आहे. मात्र यामुळे वातावरणात उकाडा वाढला आहे. या पर्यावरणीय बदलाचाही फटका बाष्पिभवनाच्या माध्यमातून जलसाठ्यांवर होत आहे. सध्या महापालिकेने पाणी कपात केली नाही, मात्र शहराच्या वेगेवेगळ्या भागात जलवाहिन्या नसल्याने तेथे टॅंन्करने पाणी पुरवठा केला जात आहे. पुढच्या काळात उन्हाची तीव्रता वाढली आणि पावसाला विलंब झाला तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
हेही वाचा : कुतूहल…‘या’ दिवशी सूर्य-चंद्राच्या मध्ये येणार पृथ्वी, जाणून घ्या सविस्तर
पाण्याचा अपव्यय
सध्या शहरात पाणी टंचाई नसली तरी पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेक ठिकाणी जलवाहिन्या फुटल्या आहेत. काही ठिकाणी अनधिकृतरित्या जोडण्या घेऊन पाणी इतरत्र वळते केले जात आहे.. बाटलीबंद पाण्याची विक्री करणारे असे प्रकार करतात. सर्वाधिक पिण्याच्या पाण्याचा अपव्यय बांधकामाच्या ठिकाणी केला जातो. काही ठिकाणी बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापरले जात असल्याची माहिती आहे. वाहनेधुणे, घरापुढे अंगणात शिंपण्यासाठी सुद्धा घरच्या नळाचे पाणी वापरले जाते.