नागपूर : आंतरराष्ट्रीय बुकी अनंत ऊर्फ सोंटू जैन याच्या कोट्यवधीच्या अवैध साम्राज्याला सुरूंग लावणाऱ्या विक्रांत अग्रवाल याने ७७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. पैसे हरल्यानंतरच सोंटू जैनविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्यात आली. मात्र, अग्रवाल याने एवढी मोठी रक्कम कुठून आणली? याबाबत पोलिसांनी अद्यापही चौकशी न केल्यामुळे या प्रकरणावर संशय निर्माण झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विक्रांत अग्रवाल हा मूळचा गोंदियाचा असून तेथे त्याचा राईस मील होता. तो तांदुळाचा व्यवसाय करीत होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्यवसायात वारंवार तोटा झाल्याने विक्रांतला राईस मील आणि काही संपत्ती बँकेकडे ५ कोटी रुपयांत गहाण ठेवावी लागली होती. २०१८-१९ पर्यंत विक्रांतला कर्ज फेडण्यात अपयश आले. त्यामुळे बँकेने त्याचा राईस मील आणि काही संपत्तीचा लिलाव करुन पैसे वसूल केले होते. यादरम्यान, व्यवसायातून त्याची ओळख आंतरराष्ट्रीय बुकी सोंटू जैनशी झाली. सोंटूने त्याला डायमंड एक्स्चेंज ऑनलाईन गेममध्ये पैसे गुंतवल्यास हमखास फायदा होईल, अशी थाप मारली होती. ते गेमींग अॅप सोंटू जैन यानेच तयार केले होते. सोंटू जैन हा गेमींग लिंक विक्रांत याला पाठवत होता आणि त्यातून विक्रांत पैसे लावत होता.

हेही वाचा : बुलढाणा : सावकारी जाचाने विवाहितेची आत्महत्या; त्रास असह्य झाल्याने उचलले टोकाचे पाऊल

सुरुवातीला झालेल्या फायद्यामुळे विक्रांत जाळ्यात अडकला. सोंटूने त्याला बनावट लिंक पाठवून ५८ कोटी रुपये लुबाडले होते. सोंटूने बनावट लिंक पाठवून फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर विक्रांतने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी विक्रांत अग्रवालच्या तक्रारीवरून थेट गुन्हा दाखल केला. मात्र, विक्रांत याने तब्बल ५८ कोटींची रक्कम कुठून आणली? याबाबत पोलिसांनी चौकशी केली नाही. विक्रांतने ती रक्कम हवाला व्यापारातून, क्रिकेट सट्टेबाजीतून किंवा अवैधरित्या कमावलेली आहे का? याबाबत चौकशी होणे गरजेचे होते. पोलिसांनी विक्रांत याच्या तक्रारीवरून सोंटूवर गुन्हा दाखल करून त्याचे अवैधरित्या उभारलेले साम्राज्य नष्ट केले. त्याची कोट्यवधी रुपयांची रक्कम, संपत्ती, सोने, चांदी जप्त केली.

हेही वाचा : नागपूर : १३५ कलाकार १२ तास शास्त्रीय नृत्यातून करणार अखंड घुंगरू नाद

७७ कोटींचा मालक अन् ५ कोटींसाठी मीलचा लिलाव

विक्रांत अग्रवालने २०२०-२१ मध्ये ७७ कोटी ५५ लाख ५४ हजार ३०० रुपये सोंटू जैनने लुबाडल्याचा दावा तक्रारीत केला होता. त्यामुळे जर विक्रांतकडे ७७ कोटी रुपये होते तर त्याने बँकेकडे ५ कोटींमध्ये गहाण ठेवलेली राईस मील का सोडवली नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे विक्रांत अग्रवाल याने गुंतवलेली रक्कम स्वतःची नसून ती रक्कम अवैध मार्गाने कमावल्याचा संशय निर्माण झाला आहे.

हेही वाचा : वाशिम : विमुक्त जाती प्रवर्गातील बेकायदेशीर घुसखोरी थांबवा; पोहरादेवी येथे अन्न व जलत्याग आंदोलन

“सोंटू जैनकडे गुंतवलेली ५८ कोटींची रक्कम ही काही मित्र, पत्नी आणि नातेवाईकांकडून घेतली होती. त्या रकमेबाबतचे सर्व कागदपत्रे आयकर विभाग आणि गुन्हे शाखेला दिले आहे. त्यामुळे माझ्या गुंतवलेल्या रकमेवर संशय घेण्याचे कारण नाही”, असे तक्रारदार विक्रांत अग्रवालने म्हटले आहे.

“विक्रांत अग्रवाल यांनी गुंतवलेल्या ५८ कोटी रुपयांच्या रकमेबाबत पैशाबाबत जवळपास चौकशी झाली आहे. रकमेबाबत काही कागदपत्रे आमच्याकडे सादर केली आहेत. काही रकमेबाबतची कागदपत्रे घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्याची पडताळणी सुरु आहे” – शुभांगी देशमुख (तपास अधिकारी, गुन्हे शाखा)

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur where did vikrant agrawal get rupees 77 crores international bookie sontu jain case online gaming app fraud adk 83 css