नागपूर: नागपूरमध्ये होणारें विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे वादळी ठरते. कधी राजकीय आरोप – प्रत्यारोपांमुळे तर कधी पक्षातील फूट यासाठी कारणीभूत ठरते. यंदा सात डिसेंबरपासून नागपूरमध्ये अधिवेशनाला सुरूवात होत आहे. मागच्या अधिवेशन काळात शिवसेनेत फूट पडल्यावर विधिमंडळ परिसरातील कार्यालय ताब्यात घेण्यावरून वाद झाला होता. आता याच मुद्यावरून राष्ट्रवादीच्या दोन गटात संघर्ष होतो का? की यावर तोडगा काढला जातो याकडे लक्ष असणार आहे.
नागपूर विधानभवन परिसरात सर्व प्रमुख पक्षांसाठी कार्यालय दिले जातात. त्यात भाजप, कॉंग्रेस, सेना, राष्ट्रवादी व अन्य मान्यताप्राप्त पक्षांचा समावेश असतो. सेनेत फूट पडल्यावर दोन्ही गटांकडून कार्यालयावर दावा केला होता. अखेर गटाला जागा देण्यात आली होती. याचीच पुनरावृत्ती यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत घडण्याची शक्यता आहे. कारण या पक्षातही फूट पडली आहे. दोन्ही गट त्यांचाच पक्ष अधिकृत असल्याचा दावा करीत असल्याने विधिमंडळ कार्यालयाचा ताबा कोणाकडे असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पक्ष आणि निवडणूक चिन्ह याबाबत निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू आहे. अधिवेशनापूर्वी याचा निकाल आयोगाने दिल्यास वादावर तोडगा निघू शकतो.