नागपूर : जंगलच नाही तर जंगलातील प्रत्येक जीवाच्या रक्षणासाठी लढणारा वनखात्याच्या पहिल्या फळीतील कर्मचारी तसा दुर्लक्षितच. मग ही कर्मचारी महिला असेल तर आणखीच दुर्लक्षित. मात्र, अलीकडच्या काळात वनखात्याच्या या पहिल्या फळीतील कर्मचाऱ्याला त्यांची ओळख मिळू लागली आहे. एक्सप्लोरिंग वुमनहूड फाऊंडेशनने त्यात भर घातली असून मागील चार वर्षांपासून त्यांना ‘वनदुर्गा’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, यावर्षी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांना सन्मानित केले जाणार आहे.
‘वनदुर्गा’ हा सोहळा यावर्षी आसाममधील गुवाहाटी येथे येत्या चार ते आठ डिसेंबरदरम्यान आयोजित केला जाणार आहे. महाराष्ट्रातील एक्सप्लोरिंग वुमनहूड फाऊंडेशनच्यावतीने दिल्या जाणाऱ्या ‘वनदुर्गा’ पुरस्काराचे वितरण देखील याच व्यासपीठावर केले जाणार आहे. या कार्यक्रमाला आसामचे मुख्यमंत्री, आसामचे वनमंत्री तसेच महाराष्ट्राचे वनमंत्री उपस्थित राहतील. महिला वनकर्मचाऱ्यांकडून अर्ज आल्यानंतर वनखात्यातील उच्च वनाधिकाऱ्यांकडून त्याची छाननी केली जाते. भ्रमणध्वनीवरून त्यांची मुलाखत घेतली जाते आणि त्यांची पार्श्वभूमी तपासली जाते. त्यानंतर वनाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच वनदुर्गा पुरस्काराची निवड केली जाते.
हेही वाचा : ‘सीॲक’च्या केंद्रांची दुरवस्था, संघ परिवारातील संस्थेला मात्र ५२ एकर जागा! राज्य शासनाच्या निर्णयाने आश्चर्य
नवीन काही करण्याचा प्रयत्न
“दरवर्षी ‘वनदुर्गा’ पुरस्कारात काहीतरी नवीन करण्याचा आमचा प्रयत्न असतो. चार पुरस्कारांपैकी तीन पुरस्कार प्रत्यक्षात कार्यक्षेत्रावर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला, तर एक पुरस्कार कर्मचाऱ्याच्या जोडीदाराला दिला जातो. या पुरस्कारामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर संधी मिळत आहे. विशेष म्हणजे या वनदुर्गांची दखल ‘जी२०’ च्या व्यासपीठावरसुद्धा घेण्यात आली” -दीपाली अतुल देवकर, संस्थापक, एक्सप्लोरिंग वुमनहुड फाउंडेशन