नागपूर : घरावर दुष्ट आत्म्याचा प्रभाव असल्याची भीती दाखवून तीन भोंदूबाबा एका महिलेला फसवत होते. तंत्र-मंत्राने घरातील ब्रम्हराक्षसाला पळवून लावण्याची बतावणी करीत महिलेकडून सोन्याचे दागिने आणि रोकड असा १२ लाख रुपयांचा माल तीन भोंदूबाबांनी उकळला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांना याची माहिती मिळाली. त्यांनी दोन आरोपींना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. हे प्रकरण हुडकेश्वर ठाण्यांतर्गत उघडकीस आले. पोलिसांनी रश्मी विजय पानबुडे (३८) रा. बँक कॉलनी, मानेवाडा रोड, यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला. ईश्वर उर्फ इंद्र पप्पू शर्मा (३५), सुनील पप्पू शर्मा (३८) आणि साहिल चिरौंजीलाल भार्गव (१९) सर्व रा. ओमकारनगर, अशी आरोपींची नावे आहेत.
नोव्हेंबर २०१६ मध्ये रश्मीचे प्रज्ञदीप बोरकर यांच्याशी लग्न झाले होते. काही दिवसातच दोघांमध्ये भांडणे होऊ लागल्यामुळे पतीने त्यांना माहेरी सोडले. रश्मीने पतीविरुद्ध घरगुती हिंसाचाराची तक्रारही दाखल केली. २००३ मध्ये रश्मीच्या वडिलांचे निधन झाले. २०२१ मध्ये आईचेही निधन झाले. लहान बहीण दीप्ती सावंत नागपुरात राहते. २०१८ मध्ये रश्मी आणि प्रज्ञदीपचे समुपदेशन सुरू होते. या दरम्यान एका परिचिताने ईश्वर शर्मा बाबत सांगितले आणि भेट घालून दिली. ईश्वरने पूजा-पाठ आणि मंत्राच्या शक्तीने भूतबाधा दूर करीत असल्याची माहिती दिली. त्याने घरी येण्यासाठी रश्मीकडून २० हजार रुपये घेतले. घराचे निरीक्षण करून प्रेतबाधा असल्याचे सांगितले. पूर्वजांची आत्मा अशांत असून भटकत आहे. त्यामुळेच वडिलांचे अकाली निधन झाले. आईचाही यामुळेच मृत्यू झाल्याची थाप मारली. पूजा-पाठ करण्याच्या नावावर तिन्ही आरोपी रश्मीकडून पैसे उकळत होते. चार वर्षांमध्ये आरोपींनी वेगवेगळ्या पूजेच्या नावावर ६.३३ लाख रोख घेतले. रश्मीचे ५.५५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिनेही आरोपी घेऊन गेले.
हेही वाचा : अवकाळी तांडव! बुलढाण्यात रात्रभर संततधार, गारपीट अन् सोसाट्याचा वारा; शेकडो गावे अंधारात
शुक्रवारी ईश्वरने रश्मी यांना फोन केला. आईची आत्मा मुक्त करण्यासाठी पूजा करावी लागेल. त्यासाठी ५० ग्रॅमहून अधिकचे सोने लागेल असे सांगितले. रश्मीकडे आता ना पैसे उरले होते आणि ना दागिने. त्यांनी बहीण दीप्तीला दागिने मागितले. दीप्तीने कारण विचारले असता रश्मीने सर्व प्रकार सांगितला. दीप्तीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांना माहिती दिली. दुपारी १२ वाजताच्या सुमारास ईश्वर आणि साहिल सोने घेण्यासाठी मानेवाडाच्या वैरागडे रुग्णालयाजवळ आले. समितीच्या सदस्यांनी त्यांना पकडले आणि हुडकेश्वर ठाण्यात घेऊन गेले. पोलिसांनी फसवणूक आणि महाराष्ट्र नरबळी व इतर अमानूष, अनिष्ठ-अघोरी प्रथा व जादू-टोणा प्रतिबंधक कायद्याच्याअंतर्गत गुन्हा नोंदवून अटक केली. सुनीलचा शोध सुरू आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.