नागपूर : वाठोडा पोलीस ठाण्यांतर्गत एका तरुण जोडप्याला दोन तोतया पोलीस कर्मचाऱ्यांनी लुटून युवकाकडून सोनसाखळी हिसकावल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर ते खरे पोलीस असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दोन्ही आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संदीप यादव आणि पंकज यादव (दोन्ही, रा. कळमना) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही कळमना ठाण्यात पोलीस हवालदार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ मार्चला रात्री नऊ वाजताच्या सुमारास १९ वर्षीय युवक हा वाठोडा पोलीस ठाणे हद्दीत, जबलपूर हायवे रोडवरील एफ.एल.डी हॉटेल समोर कारमध्ये बसून त्याच्या मैत्रिणीसह गप्पा मारत होता. संदीप आणि पंकज यांनी त्यांच्याजवळ जाऊन त्यांना आम्ही पोलीस आहोत असे सांगून धमकविण्यास सुरुवात केली. त्याच्यावर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबतही धमकावले. त्यानंतर तरुण-तरुणी घाबरले. त्याचा फायदा घेत, दोघांनीही युवकाच्या गळ्यातील सोनसाखळी काढून घेतली. याप्रकरणी दोन्ही आरोपींनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

हेही वाचा…नागपूर: मेट्रो सुरक्षारक्षकांनी सराईत सायकल चोराला पकडले

सुरुवातीला अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. केवळ त्या परिसरात उपस्थित असल्याने पोलिसांना आरोपी करण्यात आले, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात केला. न्यायालयाने अशोक कुमार विरुद्ध चंडिगढ प्रकरणातील निर्णयाच्या आधारावर अटकपूर्व जामीन मंजूर केला. न्या.वृषाली जोशी यांच्या खंडपीठाने आरोपींचा अटीसह जामीन मंजूर केला. दोन्ही आरोपींना प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन दिला आहे. दोन्ही आरोपींना प्रत्येक रविवारी दुपारी संबंधित पोलीस स्थानकात हजेरी लावायची आहे.

हेही वाचा….. तर राज्यात वीज संकट.. कोराडीतील ६६० मेगावाॅटचा संच बंद

असे उघडकीस आले प्रकरण….

संबंधित घटनेबाबत कुठेही सांगितल्यास बघून घेण्याची धमकी आरोपींनी दिली आणि निघून गेले. दरम्यान, युवकाने वाठोडा पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्यां ३९२ कलमांतर्गत गुन्हा दाखल करीत, तपासाला सुरुवात केली. वाहन क्रमांक आणि तांत्रिक तपासातून ते दोघेही कळमना ठाण्यात कर्मचारी असल्याची माहिती समोर आली. त्या दिवशी ते कामावर होते. त्यांच्याकडे गस्तीचे काम नसताना ते त्या परिसरात उपस्थित होते. याची माहिती कळमना पोलीस ठाण्याला देण्यात आली. अद्याप दोघांनाही अटक करण्यात आली नसून पोलीस याप्रकरणी तपास करीत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur young couple robbed by policemen in nagpur accused granted pre arrest bail tpd 96 psg