नागपूर : सध्या पुण्यातील स्वारगेटमधील बसमध्ये घडलेल्या लैंगिक अत्याचाराचे प्रकरण गाजत असतानाच नागपुरातील मध्यवर्ती बसस्थानकावरही अशाच कुप्रवृत्तीने केलेला प्रकार समोर आला आहे. तो युवक गर्दी असलेल्या बसमध्ये चढण्याचे नाटक करुन महिलांशी लगट करीत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे सुरक्षारक्षकाने भ्रमणध्वनीमध्ये चित्रफित तयार केली. त्यानंतर त्याला पकडून गणेशपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी त्याच्यावर गुन्हे दाखल केले. हा किळसवाणा प्रकार रविवारी दुपारी गणेशपेठ बसस्थानकावर उघडकीस आला. मंगेश असे त्या आरोपीचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश हा मानकापुरात राहतो. त्याला विकृत मानसिकतेचा असून नेहमी मध्यवर्ती बसस्थानकावर दिसतो. त्याला कुठेही जायचे नसते परंतु, महिलांकडे अश्लील नजरेने बघणे आणि त्यांच्याशी बोलण्याचा तो नेहमी प्रयत्न करतो.

महाराष्ट्र शासनाच्या बसमध्ये महिलांची गर्दी वाढली. फलाटावर बस लागण्यापूर्वीच प्रवाशांची गर्दी होते. मंगेश हा महिलांची गर्दी असलेल्या ठिकाणी जातो. त्यांच्या मागे उभा राहतो. गर्दीत तो रेटारेटी करतो. इतरांना वाटते की तो सुध्दा बसमध्ये चढण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, त्याला फक्त बसमध्ये चढण्याचा देखावा करायचा असतो. ही माहिती एका हॉकर्सनी सुरक्षारक्षकांना दिली.

मिळालेल्या माहितीची खात्री करून घेण्यासाठी येथील सुरक्षारक्षक शंकर सोनी (३५) रा. नवीन बाबुळखेडा यांनी त्या युवकावर पाळत ठेवली. मिळालेल्या माहितीची खात्री पटविली. परंतु, कुठलाच पुरावा नसल्याने त्यांचा नाईलाज झाला. मात्र, रविवारी दुपारी पुन्हा मंगेश दिसला. तो एका बसमध्ये चढताना महिलांशी गैरवर्तन करीत असताना शंकर सोनी यांनी मोबाईलव्दारे त्याचे चित्रिकरण केले. त्यानंतर त्याला ताब्यात घेतले. त्याला गणेशपेठ पोलिसांना माहिती दिली. बसस्थानक परिसरात असलेल्या पोलीस चौकीतील कर्मचारी मोहसीन यांच्या ताब्यात दिले. मोहसिन यांनी गणेशपेठ ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक निलगुंडावार यांना माहिती दिली. चौकशीत त्याने प्रवासी नसून फक्त महिलांशी गैरवर्तन करण्यासाठी बसस्थानकावर नेहमी येत असल्याची कबुली दिली. त्याच्या विरूध्द सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन केल्या प्रकरणी ११०,११७ प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.

बसस्थानकावर सीसीटीव्ही नाही

शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर अद्याप एकही सीसीटीव्ही कँमेरे नाहीत. त्यामुळे एखादी अनुचित घटना घडल्यास पोलिसांकडे सुगावा लावण्यासाठी कोणतेही साधन राहणार नाही. मात्र, बसस्थानकावर सीसीटीव्ही नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. स्वारगेट बसस्थानकासारखीच घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याठिकाणी नागपूर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक तीन पाळीत काम करतात. कर्तव्यदक्ष शंकर सोनी यांच्या सतर्कतेमुळे मोठी घटना टळल्याचे बोलले जाते.

बसस्थानकावर प्रवाशी असल्याचा दिखावा करुन बसमध्ये चढताना गैरवर्तन करताना एका युवकाला गणेशपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, त्याच्याविरुद्ध अद्याप एकाही महिलेने तक्रार दिली नाही, त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

पांडुरंग जाधव (पोलीस निरीक्षक, गणेशपेठ पोलीस ठाणे)

Story img Loader