नागपूर: नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील मकरधोकडा तलावाच्या सांडव्यावर उभे राहून स्टंटबाजी करणे काही तरुणांना चांगलच भोवले आहे. येथे तलावाच्या भिंतीवर चढून मस्ती करतांना पोहता येत नसलेल्या तरुणाचा दुपारी तलावात बुडून मृत्यू झाला असून दोघे तरुण जखमी झाले आहे. ही सर्व घटना येथे उपस्थितांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद केली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
देशाचा स्वातंत्र्य दिन गुरूवारी देशभरात अतिशय उत्साह आणि आनंदाने साजरा केला गेला. हा स्वतंत्र दिन साजरा करण्यासाठी अनेकांनी पर्यटन स्थळी गर्दी केली होती. अशीच काहीशी गर्दी नागपूर जिल्ह्याच्या उमरेड शहराजवळील मकरधोकडा तलावाजवळ देखील बघायला मिळाली. मात्र याच गर्दीचा भाग असलेल्या काही तरूणांचे नसते साहस त्यांच्या अंगलट आले आहे. यातील तीन तरुण अचानकच ज्या सांडव्यावरून तलावाचा पाणी समोरच्या दिशेने वाहते, त्या सांडव्याच्या भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करू लागले. एक तरुण तलावाच्या भिंतीवर पूर्णपने चढण्यात यशस्वी झाला. मात्र इतर दोघे भिंतीच्या शेवटच्या टोगावर पोहचणार, त्यातच तोल जाऊन खाली घसरले. दरम्यान या तरुणांना घसरतांना बघत पूर्णपने भिंतीवर चढलेला तरुण विपरीत दिशेने तलावाच्या खोल पाण्यात कोसळला.
हेही वाचा : भंडारा : भाजपाला धक्का! माजी खासदार शिशुपाल पटलेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश
परिणामी, त्याला पोहोता येत नसल्यामुळे तो खोल पाण्यात गुटांगळ्या घालू लागला. काही मिनिटांत पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. आकाश घनश्याम चकोले (२३), रा. गोपाल नगर, कळमना, जिल्हा नागपूर असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यातच येथे शेकडो लोक ही घटना बघत होते, तर काहीनी हे दृश्य मोबाइल मध्ये कैद केले. मात्र त्यातील मोजकेच लोक तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना देखील यश आले नाही. सध्या या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड वायरल होत आहे.
नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील मकरधोकडा तलावाच्या सांडव्यावर उभे राहून स्टंटबाजी करणे काही तरुणांना चांगलेच भोवले आहे. येथे तलावाच्या भिंतीवर चढून मस्ती करतांना पोहता येत नसलेल्या तरुणाचा दुपारी तलावात बुडून मृत्यू झाला असून दोघे तरुण जखमी झाले आहेत. pic.twitter.com/AoExEWR9V8
— LoksattaLive (@LoksattaLive) August 16, 2024
हेही वाचा : वर्धा : वय वर्ष चार अन् विक्रमास गवसणी, जाणून घ्या चिमुकल्याची कामगिरी…
सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह
नागपूर जिल्ह्यातही १५ ऑगस्ट रोजी सुट्टी असल्याने नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील मकरधोकडा तलाव परिसरात पर्यटकांची गर्दी होणे अपेक्षीत होते. त्यानुसार येथे गुरूवारी सकाळपासूनच पर्यटकांची चांगलीच गर्दी होती. त्यानंतरही येथे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाय का केले गेले नाही? हा प्रश्न पर्यटकांकडून उपस्थित केला जात आहे. येथे उपाय केले असते तर बुडतांना तरुणाला वाचवणे शक्य झाले असते, अथवा येथे तरुणांना पोलिसांच्या मदतीने स्टंटबाजी करण्यापासून रोखणे शक्य झाले असते, असे येथे उपस्थित पर्यटकांचे म्हणणे आहे. दरम्यान आतातरी प्रशासन येथे पर्यटकांची गर्दी राहिल, अशा दिवशी आवश्यक सुरक्षेचे उपाय करणार काय? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.