नागपूर : जगभरात ‘व्हॅलेंटाईन डे’साजरा होत असताना उपराजधानीत मात्र प्रेयसीच्या प्रेमावर संशय घेत मित्राचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला. ही थरारक घटना बुधवारी सकाळी ११ वाजता मानेवाडा चौकाजवळ नाईकनगरात घडली. सूरज ऊर्फ बिहारी अमिर महतो (२५, रा.बालाजीनगर. मानेवाडा रोड) असे मृत युवकाचे तर विपीनकुमार गुप्ता (२५, नाईकनगर) असे आरोपीचे नाव आहे. हत्याकांडानंतर आरोपी स्वत:हून अजनी पोलीस ठाण्यात पोहचला आणि पोलिसांच्या स्वाधीन झाला.
नवे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पदभार स्वीकारताच नागपुरातील गुन्हेगारांनी पुन्हा तोंड वर काढले आहे. पोलिसांची दहशत नसल्यामुळे गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र आहे. सूरज महतो हा कुख्यात गुंड असून त्याच्यावर जवळपास २१ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला नागपुरातून तडीपार करण्यात आले होते. मात्र, तो अजनी, बेलतरोडी आणि हुडकेश्वर पोलिसांशी मैत्री करून शहरातच राहत होता. त्याची आरोपी बिपीनकुमार गुप्ताशी मैत्री होती. सूरज आणि बिपीनकुमार दोघेही मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत. काही वर्षापूर्वी कामाच्या शोधात ते नागपुरात आले आणि येथेच स्थिरावले. दोघेही गुन्हेगारीत सक्रिय होते. बिपीनचे प्रेमप्रकरण सुरु होते आणि त्याच्या प्रेयसीची सूरजशी मैत्री होती.
हेही वाचा : पक्षश्रेष्ठींचे आदेश; काँग्रेसचे आमदार मुंबईत दाखल!
गेल्या काही दिवसांपासून प्रेयसीसोबत सूरजची जवळिक वाढली होती. त्यामुळे बिपीनला दोघांवरही संशय होता. बिपीनने मंगळवारी प्रेयसीला सूरजसोबत मैत्री तोडण्यास सांगितले. मात्र, तिने मैत्री तोडण्यास नकार दिला होता. त्यामुळे बिपीनचे प्रेयसीसोबत जोरदार भांडण झाले. सूरजमुळेच प्रेयसीने अबोला धरल्याचा संशय बिपीनला होता. त्यामुळे त्याने बुधवारी सकाळी सूरजला नाईकनगर चौकात वाद मिटविण्यासाठी बोलावले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा : चला खरेदीला, सोने निच्चांकी पातळीला…
पाठलाग करून ‘फिल्मीस्टाईल’ खून
नाईकनगर चौकात दुचाकीने सूरज पोहचताच बिपीन आणि त्याच्या साथिदारांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. जीव वाचविण्यासाठी सूरज पळायला लागला. आरोपींनीही त्याचा ‘फिल्मीस्टाईल’ पाठलाग केला. श्याम सिरसाठ यांच्या घरात शिरून मदतीसाठी धावा करायला लागला. मात्र, आरोपींनीही सूरजचा गळा चिरून खून केला.
तडीपार आरोपी शहरात कसा?
शहरातून तडीपार केलेले जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त गुन्हेगार शहरातच राहतात. त्यासाठी पोलीस ठाण्यातील डीबीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाच देण्यात येते. सूरज बिहारी हा तडीपार आरोपी होता. मग तो शहरात कसा फिरत होता, असा प्रश्न निर्माण झाला आहे.