नागपूर : राज्यात महिला अत्याचार व हत्याकांडाच्या घटना वाढत आहे. विशेष म्हणजे, नागपुरात सलग हत्याकांडाची मालिका सुरु झाली आहे. गृहमंत्र्यांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपराजधानीत गेल्या वर्षभरात ९१ हत्याकांड घडले आहे.

नव्या वर्षातही हत्याकांडांच्या घटना घडत आहे. पुन्हा एका हत्याकांडाने उपराजधानी हादरली असून अगदी क्षुल्लक कारणातून चौघांनी मित्राचा खून करुन मृतदेह रस्त्यावर फेकून दिला. ही घटना नागपुरातील धंतोली परिसरात घडली. लकी ऊर्फ करण राजेश नायकर (२८, रा. तकिया, धंतोली) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर कुणाल राऊत, त्याची पत्नी काजल राऊत, मेहुणा योगेश कोवे आणि मामा रुपेश वाघाडे अशी आरोपींची नावे आहे.

हेही वाचा : ‘गुड गव्हर्नन्स’ अहवालावरून माजी गृहमंत्र्यांकडून फडणवीस यांच्यावर टीका

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लकी नायकर आणि आरोपी कुणाल राऊत हे दोघेही मित्र होते. दोघेही सोबतच दारु आणि पार्ट्या करीत होते. दिवाळीत दोघांमध्ये दारु पिण्यावरुन वाद झाला. त्यावेळी लकीने कुणालला जबर मारहाण केली होती. कुणालने धंतोली पोलीस ठाण्यात लकीविरुद्ध गुन्हा दाखल केला. लकीवर गुन्हा दाखल होताच त्याच्या वडिलाचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता.

वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे लकी हा कुणालला जबाबदार ठरवत होता. तेव्हापासून तो कुणालचा राग करीत होता. लकी हा नेहमी कुणालला शिवीगाळ करुन ठार मारण्याच्या धमक्या देत होता. त्यामुळे कुणाल हा लकीच्या त्रासाला कंटाळला होता.

मैदानावरच केला खून

मंगळवारी रात्री अकरा वाजता लकी हा तकीया मैदानावर मित्रासोबत बसला होता. दरम्यान, तेथे कुणाल राऊत आला. नेहमीप्रमाणे लकीने त्याला शिवीगाळ केली. दोघांत मारहाण झाली. दरम्यान, कुणालची पत्नी काजल राऊत, मेहुणा योगेश कोवे आणि मामा रुपेश वागळे तेथे आले. चौघांनी लकीला पकडले आणि त्याच्या पोटात चाकू भोसकून खून केला. त्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून चौघांनीही पळ काढला. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल करुन कुणाल, काजल, योगेश आणि रुपेश यांना अटक केली.

हेही वाचा : खासगी प्रवासी वाहतुकीतून बेईमानी… सार्वजनिक प्रवासी वाहतूक…

भावाच्या मांडीवरच गेला भावाचा जीव

लकीवर चौघांनी हल्ला केल्याची माहिती मिळताच त्याचा भाऊ हिमांशू नायकर धावतच मैदानावर आला. मात्र, आरोपींनी त्यालाही चाकूचा धाक दाखवला आणि तेथून पळवून लावले. मात्र, हिमांशू हा काही अंतरावरुन घटना बघत होता. त्याच्या समोरच आरोपींनी भावाच्या पोटात चाकू भोसकला. आरोपी पळून गेल्यानंतर हिमांशूने गंभीर जखमी भावाला मदत करण्यासाठी धाव घेतली. मात्र, हिमांशूच्या मांडीवरच भावाचा मृत्यू झाला.

Story img Loader