नागपूर : झिम्बाब्वेमधील ‘नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नालॉजी’ (एनयुएसटी – नस्ट) परिसरातील झाडेसुद्धा आता बोलायला लागली आहेत. येथे नुकतेच ‘टॉकिंग ट्री नस्ट’ या स्मार्टफोन ॲप्लिकेशनचे अनावरण झाले. हा उपक्रम नागपूर येथील शिवाजी सायन्स इनोव्हेशन अँड इनक्युबेशन सेंटर तसेच झिम्बाब्वे येथील नस्टचा रसायनशास्त्र विभाग आणि तेथील वनसंसाधने व वन्यजीव व्यवस्थापन विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांचा परिणाम आहे. विद्यार्थ्यांचा समावेश असलेला आणि तज्ञांचे मार्गदर्शन असलेला समूह गेल्या काही महिन्यांपासून या प्रकल्पावर परिश्रमपूर्वक काम करत होते. झाडांवरील ‘क्यूआर कोड’ स्कॅन करणारे हे ॲप्लिकेशन अभ्यागतांना थेट झाडांमधूनच मौल्यवान माहिती पुरवते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : नागपूर : मेट्रो प्रशासनाला विद्रुपीकरणाचा धाक, दिला कारवाईचा इशारा

या उपक्रमात नस्टमधील वन संसाधन आणि वन्यजीव व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख डॉ. अँजेला चिचिन्ये आणि नस्ट झिम्बाब्वे येथील रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. बोंगानी न्धलोवू यालाला या तज्ञांचा सहभाग होता. त्यांच्या सहकार्यामुळे ‘टॉकिंग ट्री नस्ट’ हे स्मार्टफोन ऍप्लिकेशन झिम्बाब्वेमधील नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आणि तेथील स्थानिक लोकांसाठी उपलब्ध झाले आहे. ‘टॉकिंग ट्री नस्ट’ स्थापन करण्यासाठी दोन्ही संस्थांमधील विद्यार्थ्यांनी त्यांचे कौशल्य आणि आवड यांची सांगड घालून योगदान दिले. ‘टॉकिंग ट्री नस्ट’ स्मार्टफोन ॲप्लिकेशनमुळे परिसरात जाणाऱ्या अभ्यागतांसाठी एक तल्लीन आणि शैक्षणिक अनुभव निर्माण होईल. हा अग्रगण्य प्रकल्प केवळ विद्यापीठातील तांत्रिक प्रगतीच दाखवत नाही तर उज्वल, हरित भविष्यासाठी विज्ञान, निसर्ग आणि शिक्षण यांचा मेळ घालण्याचे महत्त्वही अधोरेखित करतो. डॉ. धोटे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी याधी अश्या पद्धतीचे स्मार्टफोन ॲप्लिकेशन, टोरो बॉटनीकल गार्डन युगांडा, लाओस स्टेट यूनिवर्सिटी नायजेरिया येथे यशस्वीरीत्या स्थापित केलेले आहे.

हेही वाचा : कैद्याने उच्च न्यायालयात केली ‘हृदया’च्या आजाराची तक्रार, न्यायालयाने कारागृह प्रशासनाला…

हे ॲप्लिकेशन ‘प्ले स्टोअर’वरून सहज ‘डाउनलोड’ करून त्याचा उपयोग करता येणे शक्य आहे. या ॲपच्या माध्यमातून त्या परिसरातील झाडांवर असलेले ‘क्यूआर कोड’ स्कॅन केल्यास त्या झाडांविषयीची संपूर्ण माहिती ऐकायला मिळते. हे ध्वनीस्वरुपात असल्याने झाडच आपल्यासोबत संवाद साधत असल्याचा भास होतो. कारण ‘क्युआर कोड’ स्कॅन करताच आधी ते झाड आपले नाव घेऊन ‘हॅलो’ म्हणते आणि त्यानंतर ते स्वत:विषयी माहिती देते.

क्युआर कोड स्कॅन करुन झाड स्वत:ची माहिती स्वत:च देतो हे आम्ही पहिल्यांदाच बघत आहे आणि अशा पद्धतीचा उपक्रम पहिल्यांदाच आमच्या देशात संस्थापित झाला आहे, असे मत डॉ. अँजेला चिचिन्ये यांनी मांडले. ‘टॉकिंग ट्री नस्ट’ हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम असून लवकरच आम्ही असा उपक्रम डॉ. सारंग धोटे यांच्या मदतीने झिम्बाब्वेतील अनेक वनविभागात लवकरच स्थापित करु, असे डॉ. बोंगानी न्धलोवू यांनी सांगितले. विज्ञान, नवकल्पना आणि निसर्ग एकत्र आल्यावर त्यातून जे साकारले जाते ते म्हणजे ‘टॉकिंग ट्री प्रकल्प’ असल्याचे ‘टॉकिंग ट्री’ या संकल्पनेचे जनक डॉ. सारंग धोटे म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur zimbabwe trees gives information after scanning qr code of the tree talking tree nust smartphone app rgc 76 css