नागपूर :महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेक राजकीय घराण्यात फूट पडली, वडिलांच्या विरुद्ध मुलीने बंड केले, भावाच्या विरुद्ध भाऊ रिंगणात उतरला. प्रत्येक निवडणुकीत हे चित्र दिसून येते, ही विधानसभा निवडणूक त्याला अपवाद नाही. नागपूर जिल्ह्यात सावनेर मतदारसंघात दोन सख्खेभाऊ परस्परांच्या विरोधात रिंगणात उतरले आहेत. एक भाजपकडून तर दुसरा अपक्ष.
नागपुरात काँग्रेसमध्ये रणजित देशमुख हे मोठे प्रस्थ होते. जि.प. अध्यक्ष, मंत्री, प्रदेशाध्यक्ष असे अनेक पदे त्यांनी भूषविली. सध्या वय झाल्याने ते सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. मात्र त्यांचे पुत्र आशीष देशमुख आणि अमोल देशमुख राजकारणात आहेत. २०१४ मध्ये आशीष देशमुख काटोलमधून भाजपचे उमेदवार होते तर अमोल देशमुख रामटेकमधून राष्ट्रवादीचे उमेदवार होते. दहा वर्षानंतर हे दोन्ही बंधू सावनेर मतदारसंघात परस्परांच्या विरोधातच उभे ठाकले आहेत. अमोल देशमुख यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे तर आशीष देशमुख भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत.या दोघांची लढत काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांच्यासोबत आहे.
हेही वाचा…यवतमाळकर स्वरकन्येच्या सत्काराला, अभिनेता सचिन येणार
सावनेर मतदारसंघात केंदार विरुद्ध देशमुख यांचे राजकीय वैर जुने आहेत. केदार यांनी येथून सातत्याने विजय मिळवला आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे ते ही निवडणूक लढवू शकत नसल्याने त्यांनी पत्नीला रिंगणात उतरवले आहे.
आशीष देशमुख यांचा राजकीय प्रवास कॉंग्रेस, भाजप, काँग्रेस आणि पुन्हा भाजप असा आहे. २०१९ मध्ये ते खुद्द तेव्हांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात ते दक्षिण-पश्चिम नागपूरमध्ये निवडणूक लढले. या लढतीत ते पराभूत झाले तरी त्यांनी घेतलेली मते लक्षणीय होती. त्यानंतर ते पुन्हा भाजपमध्ये परतले. त्यांनी काटोलसाठी प्रयत्न केले होते. पक्षाने त्याना सावनेरमध्ये पाठवले. त्या तुलनेत अमोल देशमुख राजकारणात विशेष सक्रिय नाही. निवडणुका जाहीर झाल्यावर अर्ज भरण्याच्या शेवटच्याच दिवशी ते अवतरले. त्यांची सावनेरची उमेदवारी ही काँग्रेससाठी बंड ठरते. पण ती दखलपात्र नसल्याने काँग्रेस सध्या तरी निश्चिंत आहे.
हेही वाचा…वर्धा : ‘माझी लढत देवेंद्र फडणवीस यांच्याशीच’ या खासदारांच्या वक्तव्याने…
विदर्भात अहेरीमध्ये वडिलांविरुद्ध मुलगी अशी लढत आहे. त्यानंतर सावनेरमध्ये दोन भावांमध्ये लढत आहे. काटोल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवारगटाचे नेते अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख रिंगणात आहेत पण त्यांच्या विरोधात डमी अनिल देशमुख मैदानात उतरले आहे.