यवतमाळ : विदर्भ- मराठवाड्याच्या सीमेवर नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात असलेल्या माहूरगड येथे आई रेणुका मातेचा नवरात्रोत्सव उत्साहात प्रारंभ झाला. माहूर येथील आदिमाया रेणुका देवीचे हे तीर्थक्षेत्र साडेतीन शक्तिपीठांपैकी पहिले आणि मूळ शक्तिपीठ आहे. त्यामुळे या ठिकाणी नऊ दिवस आदिशक्तीचा जागर मोठ्या प्रमाणात चालतो. गेली दोन वर्षे करोनामुळे प्रत्यक्ष नवरात्रोत्सव साजरा झाला नाही. त्यामुळे यावर्षी माहूरगडावर भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.
नांदेड येथून १३५ तर यवतमाळवरून ७० किमीवर पैनगंगा नदीच्या खोऱ्यात माहूरगड वसलेले आहे. आई रेणुकेचे जागृत देवस्थान म्हणून या तीर्थक्षेत्राची ख्याती आहे. हे मंदिर देवगिरी येथील यादवांच्या राजाने ९०० वर्षांपूर्वी बांधल्याचे सांगितले जाते. याशिवाय माहूरगडावर पूर्वी किल्लाही होता, त्याचे अवशेष आजही आहेत.
हेही वाचा : यवतमाळमध्ये मजुरांच्या वाहनाला अपघात ; एक ठार, दोन जण गंभीर
अशी आहे आख्यायिका
रेणुकामाता ही जमदग्नी ऋषींची पत्नी तर भगवान परशुरामांची आई असल्याची आख्यायिका आहे. जमदग्नी ऋषींच्या आश्रमात असलेली कामधेनू गाय येथील राजा सहस्त्रार्जुनाने मागितली. त्यावरून युद्ध झाले आणि जमदग्नी ऋषी गतप्राण झालेत. त्यानंतर भगवान परशुरामाने नरसंहार सुरू केला. मात्र, देवाधिकांनी त्यांना रोखले. भगवान परशुराम देवाधिकांची विनंती ऐकून आई-वडिलांना घेऊन कोरीभूमीकडे निघाले. ही कोरीभूमी म्हणजेच माहूरगड आहे. यावेळी दत्तप्रभूंनी त्यांना सर्व मदत केली. येथील मातृकुंडाबाबतही अशीच आख्यायिका आहे. याशिवाय रेणू राजाचीही आख्यायिका आहे. या ठिकाणी दत्तशिखर, मातृकुंड, किल्ला, दर्गा, धबधबा अशी बरीच ठिकाणे असून नवरात्रोत्सवाशिवाय वर्षभरही येथे महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटक आदी राज्यातील भाविकांची मोठी गर्दी असते.
हेही वाचा : नागपूर : जंगलातून शहरात आलेल्या नीलगायीची सुखरुप सुटका
कासवगतीने विकास
आदिशक्तीचे मूळ शक्तिपीठ असूनही माहूरगडाचा विकास मात्र कासवगतीने सुरू आहे. या ठिकाणी देवीच्या गडावर भाविकांना शेकडो पायऱ्या चढून जावे लागते. येथे ‘रोप-वे’ तयार करण्याची घोषणा झाली, मात्र अद्यापही हे काम पूर्णत्वास गेले नाही. माहूरगडावर जाणाऱ्या रस्त्यांचीही दैनावस्था आहे. त्यामुळे या ठिकाणी शासन, प्रशासनाने भाविकांना सोईसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने होत आहे. नांदेड, यवतमाळ, पुसद, तेलंगणातील अदिलाबाद आदी ठिकाणाहून माहूरगड येथे पोहचता येते.