नागपूर : गेल्या ९ वर्षांत संपूर्ण देशभरात मेट्रोचे जाळे विस्तारले असून त्यात अनेकपटींनी वाढ झाली आहे. २०१४ मध्ये देशात एकूण २४८ किमी मेट्रो मार्गिका होत्या. चालू वर्षांत (२०२३) आतापर्यंत ८३२ किलोमीटरवर मेट्रो धावू लागली आहे. केंद्रीय नगरविकास मंत्रालयाच्या माहितीनुसार देशभरात मेट्रो विस्तारीकरणाच्या कामात २०१४ नंतर गती आली आहे.
२०१४ पर्यंत देशात पाच शहरांत मेट्रोची सेवा होती. त्यात देशाची राजधानी दिल्लीचा समावेश होता. त्यानंतर पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मेट्रो सेवा विस्ताराला प्राधान्य दिल्याने नागपूरसह देशाच्या विविध भागात मेट्रोची कामे सुरू झाली. २०२१ पर्यंत एकूण १८ शहरात मेट्रो धावू लागली. मेट्रोमार्गिका बांधणीचा वेगही २०१४ नंतरच वाढला. पूर्वी तो दिवसाला अर्धा किलोमीटर होता. त्यानंतर या कामात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाल्याने सध्या हा वेग प्रतिदिवस ६ किलोमीटर आहे. सध्या ४७५.४४ किमी. मार्गिकांची कामे सुरू असून ३७२.७७ किमीच्या मार्गाला मंजुरी मिळाली आहे. नागपुरात २०१४ मध्ये मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली होती.
’महामेट्रोने अनेक अडचणींवर मात करीत शहरात पहिला टप्पा डिसेंबर २०२२ मध्ये पूर्ण केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण झाले. याच वेळी पंतप्रधानांनी मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यालाही मंजुरी दिली. त्यामुळे नागपूरलगतची छोटी शहरे मेट्रोशी जोडली जाणार आहेत. महामेट्रोतर्फे पुण्यात मेट्रोचे काम सुरू असून औरंगाबाद येथेही प्रस्तावित आहे.