लोकसत्ता टीम
अकोला: पंतप्रधान आवास योजनेत मंजुर लाभार्थ्यांना गुंठेवारी नियमानुकूल करण्यात आवश्यक कागदपत्रांची मोठी अडचण येत आहे. कागदपत्रांअभावी गुंठेवारी नियमानुकूल करण्याचे हजारावर प्रकरणे प्रलंबित आहेत. लाभार्थ्यांनी वेळेस कागदपत्रे सादर न केल्यास घरकुलाच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते.
पंतप्रधान आवास योजनेत गुंठेवारी प्लॉट धारकांचे दोन हजार ९४० घरकुले मंजुर करण्यात आली होती. अनेक कारणांमुळे लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळण्यात अडचणी येत होत्या. गुंठेवारीचे नियमानुकुल करण्याची मोठी अडचण आहे. घरकुल मंजुर होऊन तीन वर्षांचा कालावणी उलटला तरी हा प्रश्न रखडला. ही समस्या सोडविण्यासाठी महापालिका आयुक्त कविता द्विवेदी यांनी पुढाकार घेऊन विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात केली. या मोहिमेच्या माध्यमातून ५७० लाभार्थ्यांचे गुंठेवारी निमयानुकूल झाले आहेत. ५५६ लाभार्थ्यांचे नकाशे मंजूर असून २२८ लाभार्थ्यांच्या घरकुलाचे काम प्रत्यक्षात सुरु झाले.
आणखी वाचा- वर्धा: विजेच्या कडकडाटात पाऊस; शेतकऱ्यांना ‘दामिनी’ वापरण्याचा सल्ला
गुंठेवारीचे नियमानुकूल करण्यात लाभार्थ्यांच्या मनात संभ्रम होता. या प्रक्रियेसाठी नेमकी कुठले कागदपत्रे सादर करावी, याची कल्पना बहुतांश लाभार्थ्यांना नव्हती. त्यामुळे हजारो लाभार्थी योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली. लाथार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन घरकुल मंजुर लाभार्थ्यांसाठी मार्गदर्शन मेळाव्याची विशेष मोहीम सुरू केली. त्यामध्ये लाभार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. गुंठेवारीच्या दोन हजार ९४० लाभार्थ्यांपैकी सुमारे एक हजारावर लाभार्थी कागदपत्रे सादर करू शकले नसल्याने त्यांचे प्रस्ताव अडकले आहेत.
लाभार्थ्यांनी कागदपत्रे सादर केली नाही. त्यामुळे ते घरकुलाच्या लाभासाठी अपात्र ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. पंतप्रधान आवास योजनेत मंजुर लाभार्थ्यांसाठी आणखी काही दिवस विशेष मोहीम सुरूच ठेवण्यात येणार आहे. त्यावेळेत त्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर केल्यास त्यांना घरकुलाचा लाभ मिळाण्याचा मार्ग मोकळा होईल.