यवतमाळ: गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाने सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारच्या पहाटेपासून जिल्ह्यातील सर्व भागात पाऊस झाला. आज मंगळवारी पुसद आणि उमरखेड तालुक्यात पावसामुळे नदीला पूर आल्याने काही मार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद झाली.
पुसद तालुक्यात गेल्या दोन दिवसात १०५ मिमी पावासाची नोंद झाली आहे. यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे तसेच शेतातील कापूस, तुर, भाजीपाला या शेतमालाचेसुद्धा नुकसान झाले आहे. आज सकाळी पुसद तालुक्यातील पार्डी येथे नाल्याला पूर आल्यानेदोन तास रस्ता बंद होता. तसेच पुसद-उमरखेड मार्गावरील शेलु गावाजवळील पुलावरूनसुद्धा पाणी वाहत असल्याने तेथील वाहतूक ठप्प झाली आहे. पुसद येथे तीन नंबर शादी खान, पार्वती नगर, आमराई येथे अनेकांचे घरात पाणी शिरले आहे. रेस्ट हाऊस वाशिम रोड वरील पुलाला लागून प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. सुदैवाने या अवकाळी पावसामुळे अद्याप कोणतीही जीवित हानी झाली नाही.
हेही वाचा… गडचिरोली जिल्ह्यात मराठा – कुणबीची एकही नोंद नाही, ४९ हजार ६९१ कुणबी नोंदी
अवकाळी पावसाने खरिपातील हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. तुरीचे आणि कापूस पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे . पावसामुळे कापसाची प्रत घसरल्याने बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. पावसाने भाजीपाला सोबत फळबागांचेही नुकसान झाले आहे. यासोबतच रब्बी पिकांनाही धोका निर्माण झाला आहे.
गारठा वाढला
अवकाळी पावसाने वातावरणात गारठा वाढला आहे. आज सकाळपासून पाऊस, थंडी आणि धुके यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. एकाचवेळी रेनकोट, गरम कपडे घालून नागरिक घराबाहेर पडत आहे.