नागपूर : भाजपचे नागपूर जिल्हा प्रभारी व मध्य प्रदेशचे मंत्री कैलास विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे भाजप पदाधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक झाली. यावेळी शिवसेनेचे (शिंदेगट) आमदार ॲड. आशिष जयस्वाल यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांना विरोध दर्शवला.
रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा दारुण पराभव झाला. शिवसेनेचा हा पारंपारिक मतदारसंघ मानला जातो. काँग्रेसने ही जागा परत मिळवली आहे. रामटेक विधानसभा मतदारसंघाचे ॲड. जयस्वाल यांनी अनेक वर्षे नेतृत्व करीत आहेत. २०१९ मध्ये ही जागा भाजपने लढली होती. तर जयस्वाल यांनी बंडखोरी केली आणि थोड्या मतांनी विजय मिळवला होता. आता या मतदारसंघात महायुतीमधील भाजप आणि शिवसेनेची रस्सीखेच सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामटेक लोकसभा लढण्याचा आग्रह धरला, परंतु त्यांना भाजपने आयात केलेला उमेदवार द्यावा लागला होता.
हे ही वाचा…राष्ट्रवादीच्या जेष्ठ मंत्र्याच्या घरातच फूट, मुलगी लवकरच शरद पवार गटात…सोबत जावयानेही….
आता परत शिंदे सेनेचे जयस्वाल यांना रामटेकची उमेदवारी हवी आहे. ते विद्यमान आमदार आहेत. तर भाजपचे माजी आमदार, स्थानिक पदाधिकारी जयस्वाल विरोधात आक्रमक आहे. कोणत्याही परिस्थिती ही जागा भाजपने लढण्याचा त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे रामटेक विधानसभा मतदारसंघात महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारला समर्थन देणारे आमदार आशिष जयस्वाल यांचे विधानसभा निवडणुकीत काम न करण्याचा निर्णय भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
रामटेक येथे २०१९ च्या निवडणुकीत भाजपने माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी आमदार आशिष जयस्वाल हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले व जिंकले. आमदार जयस्वाल यांनी त्यावेळी युतीचा धर्म पाळला नाही, असा आरोप रेड्डी यांनी बैठकीनंतर केला. यामुळेच यावेळी महायुतीने जयस्वाल यांना उमेदवारी दिलीतर भाजप कार्यकर्ते त्यांचे काम करणार नाही, युतीने दुसऱ्या कुणालाही उमेदवारी दिली तर आम्ही काम करू, अशी भावना भाजप पदाधिकाऱ्यांनी विजयवर्गीय यांच्या समोर व्यक्त केली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे हेदेखील उपस्थित होते. त्यांच्या समक्षच कार्यकर्ते संतप्त झाले.
हे ही वाचा…वर्धा: विधानसभेवेळी ‘ अमर ‘ पॅटर्न चालणार ? उमेदवार व मतदारसंघ अदलाबदलीचा सूर.
रामटेकच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची मागणी
रामटेक विधानसभा क्षेत्रात शेतकऱ्यांचे सिंचनाचे प्रश्न, देवलापारला तहसील करणे, बेरोजगारांचे प्रश्न, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे, आदिवासी क्षेत्राचा विकास, अशा विविध विषयांवर रामटेक विधानसभा क्षेत्रात काम झाले नाही. त्यामुळे भाजपा पक्ष वाढविण्यासाठी यावेळी भाजपाने आपला उमेदवार द्यावा अशी मागणीही बैठकीत करण्यात आल्याचे डॉ. राजेश ठाकरे, विजय हटवार, अलोक मानकर, उमेश पटले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.